
मुंबई | Mumbai
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये तुफान कलगीतुरा रंगताना पाहायला मिळाला आहे. या पार्श्वभूममीवर अधिवेशन शेवटाकडे येत असताना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत भाषण केलं. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर केलेल्या भाषणात विं.दा. करंदीकर यांच्या कवितेतल्या ओळी ऐकवून राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.
'आज आनंदाची गोष्ट आहे की छोटं का होईना, पण मुख्यमंत्र्यांचं भाषण या सभागृहात ऐकायला मिळालं. त्यांनी चांगलं काम करत असल्याचं सांगितलं. कदाचित ते विसरले असतील. ५० हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना द्यायचे होते वगैरे आश्वासनं होती. पण त्यांचं भाषण ऐकायला मिळालं याचा आनंद आहे,' असं फडणवीस म्हणाले.
पुढे बोलतांना, ना नवे प्रकल्प, ना नवे योजना, सुरु प्रकल्प बंद, केवळ टीका, आरोप, टोमणे या पलिकडे काहीच नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी विं दा करंदीकर याची, 'सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते !! तेच ते !! माकडछाप दंतमंजन, तोच चहा तेच रंजन तीच गाणी तेच तराणे, तेच मूर्ख तेच शहाणे सकाळपासुन रात्रीपर्यंत तेच ते तेच ते... खानावळीही बदलून पाहिल्या, कारण जीभ बदलणं शक्य नव्हतं. काकू पासून ताजमहाल, सगळीकडे सारखेच हाल... नरम मसाला, गरम मसाला, तोच तो भाजीपाला तीच ती खवट चटणी, तेच ते आंबट सार... सुख थोडे दु:ख फार' हि कविता सादर केली. याशिवाय फडणवीसांनी कवि पी एल बामनिया यांची कविता सादर केली. तुम चाहो तबेलो को बाजार कह दो, तुम चाहो पतझडो को बहार कह दो। तुम्हारा ही राज है अभी यहाँ पर, तुम चाहो तो स्कूटर को कार कह दो। असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.