
मुंबई | Mumbai
राज्यात सध्या ड्रग्ज प्रकरण (Drug Case) चांगलेच गाजत असून विरोधकांकडून सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणेशोत्सवात पूजेसाठी आलेला बिग बॉस ओटीटी २ विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) हा देखील ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत आला आहे. त्याच्यावर क्लब आणि पार्ट्यांमध्ये विषारी सापांची तस्करी केल्याचे आरोप करण्यात आले असून याप्रकरणी त्याच्याविरुद्ध नोएडामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता ड्रग्ज प्रकरणात विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिले आहे...
यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले की, ड्रग्जच्या संबंधात गुंतलेल्या लोकांवर जेवढे कडक कायदे आहेत, ते सगळे लावण्यात येतील. आपण ड्रग्ज फ्री महाराष्ट्र (Maharashtra) अभियान सुरू केले आहे. प्रत्येक जिल्ह्यात छापे (Raid) टाकले जात आहेत. अपराधी असणाऱ्यांवर तर कारवाई होईलच जे पोलिस (Police) यामध्ये गुंतलेले असतील त्यांना फक्त निलंबित नाही तर ३११ प्रमाणे त्यांना बडतर्फ केले जाईल, असे फडणवीसांनी सांगितले. तसेच कुठल्याही पुराव्याशिवाय केलेले आरोपांना काहीही अर्थ नसतो.अनेकवेळा ते घुमून फिरून आपल्याकडेच येतात. त्यामुळे राजकीय नेत्यांनी असे आरोप करु नयेत, असेही फडणवीस यांनी म्हटले.
तर एल्विश यादव ड्रग्ज प्रकरणामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केलेल्या आरोपांवर बोलतांना फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्र्यांकडे गणेशोत्सव असतो तेव्हा वेगवेगळे सेलिब्रीटी येत असतात. त्यावेळी एल्विश यादव कुठलातरी रिअॅलिटी शो जिंकला होता. असे अनेक सेलिब्रिटी त्यावेळी येऊन गेले. ज्यावेळी तो येऊन गेला तेव्हा त्याच्यावर कुठलाही आरोप नव्हता. त्यावेळी तो एक सेलिब्रेटी म्हणून आला असेल, आता त्याच्यावर आरोप आहे असे म्हणून जर हिशोब करायला लागलो तर महाराष्ट्रातील अनेक पुढाऱ्यांना अडचणी होतील, असेही फडणवीसांनी म्हटले. तसेच विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांवर (CM) आरोप लावण्याचे धंदे चालले असून हे वैफल्यग्रस्त धंदे उबाठाचे लोक करत आहेत, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.