
मुंबई | Mumbai
शिवप्रतिष्ठानचे प्रमुख मनोहर उर्फ संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. भिडेंविरोधात राज्यभरात अनेक ठिकाणी मोर्चे आणि आंदोलने करण्यात येत आहेत.
अशातच संभाजी भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (Rainy Season) देखील उमटल्याचे पाहायला मिळाले. आज (२ ऑगस्ट) रोजी अधिवेशनात काँग्रेस आमदारांनी (MLA) संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली. त्यामुळे विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावर निवेदन केले.
यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले की, "अमरावतीतल्या (Amravati) भाषणाप्रकरणी संभाजी भिडे यांच्यावरील कारवाईला सुरुवात झाली आहे. संभाजी भिडे गुरुजींना सीआरपीसीच्या कलम ४१ अ अंतर्गत नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधला आहे. संभाजी भिडे यांनी नोटीस स्वीकारली आहे. याप्रकरणी त्यांची चौकशी होईल असे फडणवीसांनी सांगितले.
फडणवीस पुढे म्हणाले की, "संभाजी भिडे यांनी अमरावती येथे एक भाषण केले. त्यात त्यांनी आपल्या सहकाऱ्याला पुस्तक वाचायला लावले. त्यातील आशयावरून काही कमेंट्स केल्या आहेत. ती दोन पुस्तके डॉ. एस. के. नारायणाचार्य आणि घोष यांची आहेत. ते काँग्रेसचे नेते आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या पुस्तकातील मजकूर संभाजी भिडे गुरूजी यांनी त्यांच्या सहकाऱ्यामार्फत उद्धृत केला. त्यातील एका पुस्तकाचे नाव द कुराण अॅण्ड द फकीर या १९२ पानाच्या पुस्तकाबद्दल व्हिडीओत दिसते. अमरावती येथील राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. भारतीय दंड विधान कलम १५३ अ, ५००, ५०५ (२), ३४ तसेच मपोका सह कलम १३५ अन्वये २९ जुलै २०२३ रोजी संभाजी भिडे गुरूजी व अन्य दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, यावेळी फडणवीस हे संभाजी भिडे यांच्याबद्दल विधानसभेत निवेदन करत असताना सतत 'संभाजी भिडे गुरुजी' असा उल्लेख करत होते. यावर काँग्रेसच्या नेत्यांनी आक्षेप घेतला. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, 'आम्हाला गुरुजी वाटतात. काय अडचण आहे? त्यांचे नाव भिडे गुरूजी आहे, असे म्हटले. तसेच संभाजी भिडे यांनी अमरावती येथील सभेत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे व्हिडीओ उपलब्ध नाहीत, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे समाजमाध्यमांवर जे व्हिडीओ फिरत आहेत, त्याचे व्हॉईस सॅम्पल्स तपासले जातील आणि याप्रकरणी योग्य कारवाई केली जाईल, अशी माहिती फडणवीसांनी विधानसभेत दिली.