
मुंबई | Mumbai
आज कर्नाटक (Karnataka) विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून याठिकाणी काँग्रेसने (Congress) भाजप आणि जनता दल (धर्मनिपेक्षक) यांचा धुव्वा उडवत ऐतिहासिक विजय मिळवला आहे...
विधानसभेच्या २२४ जागांपैकी तब्बल १३६ जागांवर आघाडी घेत काँग्रेसने कर्नाटकाची सत्ता काबीज केली आहे. तर भाजप ६५, जेडीएस १९ आणि इतरांना ०४ जागांवर विजय मिळाला आहे. या निवडणुकीच्या निकालावर (Election Results) आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
फडणवीस म्हणाले की, ''कर्नाटकमध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळाले नसून कर्नाटकात कोणतेच सरकार परत येत नाही. एखादा दुसरा अपवाद सोडला, तर ते बदलत असते. यावेळी आम्ही कल तोडू शकेल, असं वाटतं होते. पण, तसं झालं नाही. २०१८ साली भाजपच्या १०६ जागा निवडून येत ३६ टक्के मते (Vote) मिळाले होती. आता भाजपला ३५.६ टक्के मते मिळाली आहेत. म्हणजे ०.४ टक्के मते भाजपची कमी झाली आहेत. तसेच ४० जागाही कमी झाल्या,'' असे देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) म्हटले.
पुढे ते म्हणाले की, "काही लोकांना देश जिंकले, असं वाटत आहे. त्यांनी आधीच्या निवडणुकीचे निकाल बघितले पाहिजे. वार्डाच्या निवडणुकीत आम्ही हरलो तरी, त्यांना शाह मोदींचा पराभव दिसतो. त्यामुळे 'बेगाणे की शादी में अब्दुला दिवाणा' अशी काही लोकांची स्थिती आहे. या लोकांनी आयुष्यभर दुसऱ्यांच्या घरी मुले झाले, तर आनंद साजरा केला. या निकालाचा महाराष्ट्र आणि देशाच्या निकालावर काही परिणाम होणार नाही'' असेही फडणवीसांनी म्हटले.