विकासकामे मार्गी लागणार?

नव आयुक्तांपुढे अपेक्षांचे ओझे
विकासकामे मार्गी लागणार?

नाशिक । फारूक पठाण Nashik

2017 ते 2022 या पाच वर्षाच्या काळात नाशिक महापालिकेत भारतीय जनता पक्षाची ( BJP) एक हाती सत्ता होती. या पाच वर्षाच्या काळात विविध प्रकारे शहराचा विकास करण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर लॉजिस्टिक पार्क, आयटी हब, नमामि गोदा प्रकल्प तसेच शहरातील महापालिकेच्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या भूखंडांचा बीओटी तत्त्वावर विकास आदी महत्त्वाचे प्रकल्प मागील काही काळापासून साईड लाईन वर आहे. राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर कामांना ब्रेक लागल्याचे चित्र होते, मात्र भाजप व एकनाथ शिंदे यांचे सरकार आल्यामुळे तसेच मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय समजले जाणारे आयुक्त म्हणून नवीन आयुक्तांनी नाशिक महापालिकेचा पदभार स्वीकारल्यामुळे हे प्रकल्प पूर्ण होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नाशिक महापालिकेत सध्या प्रशासक राजवट सुरू आहे. त्यामुळे सर्व नगरसेवक हे माजी नगरसेवक झाले आहे. दरम्यान नाशिक मनपाला गत चार महिन्यांत दोन आयुक्त लाभलेे. शुक्रवारी आयुक्त असलेले रमेश पवार यांची तडकाफडकी बदली होऊन त्यांच्या जागी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Dr. Chandrakant Pulkundwar)यांची नियुक्ती झाली.

नाशिककरांना आता पुलकुंडवार यांच्याकडून शहराच्या विकासासह अपेक्षा वाढल्या आहेत. नाशिक महापालिकेची आर्थिक घडी काहीशी विस्कटली आहे. ती सुधारण्याबरोबरच नाशिकचे स्थान येत्या काही दिवसांत उंचविण्याचे आव्हान असणार आहे. गेल्या काही वर्षांपासून नाशिककरांना पार्किंगची व्यवस्था नसल्याने विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांनी मुंबईच्या धर्तीवर वाहनतळ उभारणार असल्याचे म्हटले होते. परंतु, हे धोरण राबविण्यापूर्वीच त्यांची बदली झाली. आता आयुक्त म्हणून पुलकुंडवार यांना पार्किंग, अतिक्रमण, खड्डेमुक्त शहर, सुंदर शहर याबाबतीत नाशिककरांना त्यांच्याकडून अपेक्षा असणार आहेत.

तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांची तडकाफडकी बदलीमागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याची चर्चा आता होऊ लागली आहे. पवार हे मातोश्रीजवळील असल्यानेच त्यांची उचलबांगडी झाल्याचे बोलू लागले आहेत. मात्र, आता पवार यांची बदली झाल्यावर डॉ. पुलकुंडवार यांना नाशिकसाठी विकासाच्या दृष्टीने काम करावे लागणार आहे. गत पाच वर्षांमध्ये भाजप सत्ता काळात केंद्राच्या मदतीने अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन झाले आहे.

नाशिकमध्ये बहुप्रतीक्षित नियो मेट्रो, इलेक्ट्रिक बस यांसह आयटी हब, नमामि गोदा, लॉजिस्टिक पार्क, ट्रकटर्मिनल आदी महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभे राहणार आहेत. हे प्रकल्प उभे करताना आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांना त्यांनी केलेल्या बहुचर्चित समृद्धी महामार्गाच्या कामाचा अनुभव कामी येणार हे मात्र निश्चित. नाशिकमध्ये होणार्‍या कामांमध्ये आयुक्तांची भूमिका महत्त्वाची असणार आहे.

एकीकडे नाशिकमध्ये हे प्रकल्प उभे राहणार असले तरी सद्यस्थितीत नाशिककरांना चांगले रस्ते हवे आहेत, गेल्या काही दिवसांमध्ये नाशिकमधील रस्त्यांची दुर्दशा दयनीय झाली आहे. कोट्यवधींचा खर्च करूनही एवढे खड्डे पडतातच कसे, हा नाशिककरांना सध्या प्रश्न पडला आहे. या समस्येतून नागरिकांची सुटका करावी लागणार आहे. नमामि गोदा प्रकल्पासाठी अद्याप कन्सल्टंटची नेमणूक झाली नाही. हे काम करण्याबरोबरच पालिकेचा जो आर्थिक ढाचा काहीसा ढासळला आहे. तो सुस्थितीत आणावा लागणार आहे.

यापूर्वीचे पालिका आयुक्त रमेश पवारांनी पालिकेचे आर्थिक उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून आले होते. पाणीपट्टी, घरपट्टीची कोट्यवधींची थकबाकी नागरिकांकडे आहे. यामुळे पालिकेसमोर महसुलाची चणचण भासत आहे. कर विभागात अपुर्‍या मनुष्यबळामुळे थकीत बिले वसूल करण्यात अडचणी येत आहे. त्यामुळे डॉ. पुलकुंडवार यांना यातून मार्ग काढावा लागणार आहे.

पहिल्याच दिवशी मनपा कामकाजाचा आढावा

समृद्धी महामार्ग तयार करताना मोलाची भूमिका बजावणारे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे मानले जाणारे अधिकारी म्हणून डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची ओळख राज्यभर आहे. शासनाने त्यांची नाशिक महापालिका आयुक्त म्हणून नुकतीच नियुक्ती केली आहे. शनिवारी 23 जुलै रोजी त्यांनी सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान महापालिकेत येऊन एकतर्फे कार्यभार स्वीकारला. कागदपत्रांवर सह्या झाल्यानंतर त्यांनी तात्काळ आयुक्त कार्यालयाच्या शेजारी असलेल्या दालनात महापालिकेच्या वरिष्ठ अधिकारी तसेच सर्व विभाग प्रमुखांची बैठक आयोजित करून महापालिकेच्या कामाचा आढावा घेतला.

विभाग प्रमुखांना दोन प्रश्न विचारले होते. त्यामध्ये आपला महापालिकेचा पगार कोणत्या तारखेला होतो तसेच शहरात पाणी किती दिवसांनी येतो. त्यावर अधिकार्‍यांनी उत्तर देताना दर महिन्याच्या एक तारखेला पगार होतो तर शहरात दररोज पाणी येते असे उत्तर दिले होते या दोन प्रश्नांमधून त्यांनी नाशिक शहराच्या कारभाराच्या तसेच महापालिकेच्या आर्थिक स्थितीच्या अचूक अंदाज घेतल्याचे सांगितले जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com