कृषी पर्यटनाला चालना देण्याचा निर्धार

जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय परिषद
कृषी पर्यटनाला चालना देण्याचा निर्धार

मुंबई । प्रतिनिधी

करोनोत्तर काळात जगभरात कृषी आणि ग्रामीण पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. कृषी पर्यटनातूनच पर्यावरण सुलभ आणि शाश्वत पर्यटन साध्य केले जाऊ शकते. वाढते नागरिकीकरण, करोनासारख्या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर कृषी आणि ग्रामीण पर्यटनाला येत्या काळात मोठा वाव असल्याने या पर्यटनाला चालना देण्याचा निर्धार शनिवारी दोन दिवसीय ऑनलाईन आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये व्यक्त करण्यात आला.

चौदाव्या जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त पर्यटन विभाग आणि बारामती येथील कृषी पर्यटन विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक कृषी पर्यटन परिषद २०२१’ ही दिनांक शनिवार आणि उद्या, रविवारी ऑनलाईन माध्यमाद्वारे आयोजित केली आहे. यंदाच्या परिषदेत ‘कृषी पर्यटन- महिला शेतकरी उद्यमशीलता विकास’ अशी थीम आहे.

कृषी मंत्री दादा भुसे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्यासह देशविदेशातील मान्यवरांच्या ऑनलाईन उपस्थितीत आज या परिषदेचा शुभारंभ करण्यात आला. यंदाच्या या आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन परिषदेला अमेरिकेतील ओरेगॉन, इलिनॉय, व्हरमाँट या राज्यांतून तसेच इटली, युगांडा, दक्षिण आफ्रिका, फिलिपिन्स, स्कॉटलँड, स्पेन, थायलंड या देशातून शेतकरी, संशोधक, पर्यटन विशेष सल्लागार निमंत्रित केले आहेत. या परिषदेद्वारे कृषी पर्यटन विषयातील माहितीचा आणि ज्ञानाचा खजिना उपलब्ध करून दिला आहे. त्याचबरोबर महिला शेतकऱ्यांनी कृषी पर्यटनाच्या क्षेत्रात केलेल्या भव्य कामगिरीची माहिती मिळणार आहे. परिषदेत ‘जागतिक कृषी पर्यटन पुरस्कार २०२१’ देण्यात येणार आहेत.

राज्यात कृषी विभागाच्या ३० टक्के योजना या महिला शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचपद्धतीने कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी या क्षेत्रातील घटकांना कृषी विभागाच्या योजनांचा लाभ प्राधान्याने देण्याचे धोरण ठरवू. जगाच्या पाठीवर कृषी पर्यटनात करण्यात येत असलेल्या विविध प्रयोगांची माहिती या कृषी पर्यटन परिषदेतून मिळेल, असा विश्वास दादाजी भुसे यांनी व्यक्त केला.

तर महाराष्ट्र कृषी पर्यटन धोरण जाहीर करुन राज्याने या क्षेत्रात आघाडी घेतली आहे. आपला देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. त्याद्वारे इथे कृषी पर्यटनाला मोठा वाव आहे. इटली, स्पेनसह विविध युरोपीयन देश, अमेरिका आदी ठिकाणी कृषी पर्यटनात विविध प्रयोग केले जात आहेत. राज्यातही त्याच पद्धतीने कृषी आणि ग्रामीण पर्यटनाला मोठा वाव आहे. कोरोनोत्तर काळात या क्षेत्राला मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येईल, असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com