
नाशिक | अनिरुद्ध जोशी
शिवसेनेत दोन गट पडल्यापासून मुंबईत दोन दसरा मेळावे साजरे होत आहेत. एकीकडे उद्धव ठाकरे यांचा मेळावा परंपरेप्रमाणे शिवाजी पार्कवर तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा मेळावा यंदा आझाद मैदानावर पार पडला. कुणाच्या मेळाव्याला अधिक गर्दी? ठाकरेंचे भाषण, शिंदेंचे भाषण. कुणाची सभा पॉवरफुल्ल? याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार रंगली आहे....
गेल्या वर्षी जूनमध्ये शिवसेनेत बंड झाले. बंडानंतर शिवसेनेतील नेते हळूहळू ठाकरेंना सोडून शिंदे गटात जाऊ लागले. यामुळे ठाकरेंना सहानुभूती मिळाली, त्यामुळे हजारो जणांची गेल्यावर्षी दसरा मेळाव्याला उपस्थिती होती. बंडानंतर ठाकरेंच्या महाराष्ट्रातील अनेक शहरांच्या दौऱ्याने मेळाव्याला गर्दी वाढल्याचे दिसून आले. मात्र यावर्षीच्या सभेसाठी ठाकरेंनी उरलेल्या आमदारांनाही लोकं आणण्यासाठी विशिष्ट टार्गेट दिले नव्हते. मेळाव्यासाठी राज्यातून आलेले लोक हे स्व:खर्चाने भाकरी बांधून आले होते.
शिंदे गटाचा मागील मेळावा हा बीकेसीला पार पडला होता. गावोगावचा शिवसैनिक यावा, ताकद दाखवायची, या इर्षेने शिंदे गटाने तगडे प्लॅनिंग केले होते. पक्षफुटीनंतर पहिलाच मेळावा झाल्याने मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आले. मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज मंडळी, जयदेव ठाकरे यांचं कुटुंब, अयोध्येतील संत महंत यांची उपस्थिती होती. यंदा आझाद मैदानात धनुष्यबाण असलेले मोठे कटआऊट्स लावण्यात आले. ठाण्यातील शेवटच्या सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी वापरलेली खुर्ची व्यासपीठाच्या मध्यभागी ठेवण्यात आली. ग्रामीण भागातील आमदारांनी मतदारसंघात खाजगी बस, एसटी बसही बुक केल्या होत्या.
हाती मशाल आणि भगवं उपरणं घेत शिवसैनिक शिवतीर्थावर दिसले. तर आझाद मैदानावर झेंड्यांचीच संख्या मोठी असल्याचे चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. सोशल मीडियावर दोघांच्या भाषणाचे व्हिडिओ, फोटो व्हायरल होत आहेत. नेटकऱ्यांनी मेळाव्याचे काही मीम्सही व्हायरल केले आहेत. आपला नेताच श्रेष्ठ हे पटवून देण्यासाठी सोशल मिडियाचा पुरेपूर वापर केला जात आहे. कुणाचा मेळावा पॉवरफुल्ल झाला यावर आता 'सोशल मिडिया वॉर' सुरु झाला आहे. बाळासाहेबांचा दसरा मेळावा वेगळाच होता. त्यातून एक विचार मिळत असे, शिवसैनिकांना उर्जा मिळत असे, मात्र आताचे दसरा मेळावे हे मेळावे नसून राजकीय कुरघोड्या करण्याचे व्यासपीठ असल्याच्या चर्चाही सध्या सुरु आहेत.