Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमहाविकास आघाडी सरकारवर जनता समाधानी

महाविकास आघाडी सरकारवर जनता समाधानी

नाशिक

महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीवर समाधानी असल्याचे मत ‘देशदूत डॉट कॉम’च्या सर्वेक्षणामध्ये वाचकांनी व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना ५१ टक्के जनतेने ८० टक्क्यांपेक्षा जास्त मार्क दिले आहेत.

- Advertisement -

२८ नोव्हेंबर २०१९ रोजी तीन विरोधी विचारसरणी असलेल्या पक्षांचे सरकार सत्तेवर आले. हे सरकार वर्षभर चालणार नाही, असे भाकित त्यावेळी केले गेले. परंतु महाविकास आघाडीचे सरकार आज वर्षपुर्ती साजरी करत आहे. अजूनही ५४ टक्के वाचकांना सरकार आपला कार्यकाळ पुर्ण करेल, असा विश्वास वाटत आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने एकत्र येऊन स्थापन केलेल्या या सरकारसंदर्भात ‘देशदूत डॉट कॉम’ने ऑनलाईन सर्वेक्षणाच्या माध्यमातून वाचकांची मते जाणून घेतली. ‘देशदूत डॉट कॉम’च्या माध्यमातून केलेल्या या सर्वेक्षणात हजारो वाचकांनी सहभाग नोंदवून उत्तरे दिली. या सर्वेक्षणात आठ प्रश्न विचारण्यात आले होते.

सरकारच्या कामगिरीवर समाधानी

महाविकास आघाडी सरकारच्या १२ महिन्यांतील तीन महिने वगळता कोरोना काळाच होता. या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी राज्यातील अनेक भागात दौरे केले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभर भटकंती केली. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरुन कामकाज पहिले. त्यावर विरोधकांनी टीकाही केली. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीवर पहिला प्रश्न विचारण्यात आला. महाविकास आघाडी सरकारची वर्षभराची कामगिरी कशी वाटते? या प्रश्नावर ५६ टक्के वाचकांनी चांगले असे उत्तर दिले तर २४ टक्के वाचकांनी बरे हे उत्तर दिले. २० टक्के वाचक तटस्थ राहिले.

कोरोनासंदर्भात काय वाटते?

देशात कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग महाराष्ट्रात झाला. राज्यातील १८ लाखांपेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची लागण झाली. ४६ हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर ६६ टक्के वाचकांनी सरकारने कोरोनाची परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळल्याचे म्हटले आहे. ३२ टक्के वाचकांनी विरोधात मत नोंदवले आहे तर २ टक्के तटस्थ राहिले आहेत.

कोरोनाचा कामगिरीवर परिणाम

कोरोनाकाळातच नऊ महिने गेले. यामुळे विकास कामांना पहिले तीनच महिने सरकारला मिळाले. सरकारच्या कामगिरीवर कोरोनाचा परिणाम झाला आहे का? या प्रश्नावर ६३ टक्के वाचकांनी होय असे उत्तर दिले. २८ टक्के वाचकांनी नाही, असे उत्तर दिले तर ९ टक्के वाचक तटस्थ राहिले.

मुख्यमंत्री म्हणून ठाकरेंना पसंती

संघटनेतून सक्रिय राजकारणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आले. यामुळे मुख्यमंत्री म्हणून ते कितपत यशस्वी ठरतील, असा प्रश्न होता. त्यात ५१ टक्के वाचकांनी उद्धव ठाकरे यांना ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण दिले आहेत. १६ टक्के वाचकांनी ७९ ते ५१ टक्के गुण दिले. तर ५० टक्क्यांपेक्षा कमी गुण ३३ टक्के वाचकांनी दिले आहेत.

सरकारवर प्रभाव राष्ट्रवादीचा

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये वजनदार खाते राष्ट्रवादीकडे आहेत. तसेच या पक्षातील मंत्र्यांचा अनुभव मोठा आहे. यामुळे सरकारमधील प्रभावी पक्ष म्हणून तब्बल ७३ टक्के वाचकांनी राष्ट्रवादीचे नाव घेतले आहे. काँग्रेसला केवळ ४ टक्के तर शिवसेनेला २३ टक्के वाचकांनी सरकारमधील प्रभावी पक्ष ठरवला आहे.

पाच वर्ष टिकणार का?

तीन वेगळ्या विचारसरणीचे सरकार असल्याने ते पाच वर्ष टिकेल का? हा प्रश्न सुरवातीपासून राज्यातील नागरिकांच्या मनात आहे. मात्र ५४ टक्के वाचकांनी सरकार आपला कार्यकाळ पुर्ण करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. ३१ टक्के वाचकांनी नकारार्थी उत्तर दिले आहे तर १५ टक्के वाचकांनी सांगता येत नसल्याचे म्हटले आहे.

विरोधक म्हणून भाजपकडून निराशा

मागील शिवसेना-भाजप सरकारमध्ये मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस आता विरोधी पक्षनेते आहेत. परंतु विरोधक म्हणून वाचकांनी भाजपच्या कामगिरीवर नापसंती व्यक्त केली आहे. केवळ ३५ टक्के वाचकांना विरोधक म्हणून भाजपची कामगिरी चांगली वाटत आहे तर ३० टक्क्यांनी बरी असे उत्तर दिले आहे. ३५ टक्के वाचकांनी वाईट असे उत्तर दिले आहे.

शेतकरी कर्जमुक्ती लोकप्रिय योजना

ठाकरे सरकारने राबलेल्या तीन महत्वाच्या योजनेत शेतकरी कर्जमुक्तीच्या निर्णयास ४३ टक्के वाचकांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. त्यानंतर माझे कुटुंब, माझी जबाबदारी योजनेस ३९ तर शिवभोजन योजनेस १८ टक्के वाचकांनी आपली पसंती दिली आहे.

शेतकरी कर्जमुक्ती लोकप्रिय योजना

ठाकरे सरकारने राबलेल्या तीन महत्वाच्या योजनेत शेतकरी कर्जमुक्तीच्या निर्णयास ४३ टक्के वाचकांनी पसंती दिली आहे. त्यानंतर माझे कुटुंब, माझी जबाबदारी योजनेस ३९ तर शिवभोजन योजना १८ टक्के वाचकांनी आपली पसंती दिली आहे.

एकंदरीत या सर्वेक्षणावरुन महाविकास आघाडीच्या सरकारबाबत नागरिक आशावादी आहेत. या सरकारला मिळालेली ही एक संधी आहे, त्याचा फायदा घेत राज्याचा व राज्यातील जनतेचा विकास सरकारने करावा, अशीच अपेक्षा या सर्वेक्षणातून दिसून येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या