
निफाड । प्रतिनिधी Niphad
चार वर्षांपासून रखडलेला रस्ता चार तासांत पूर्ण झाला आहे. दैनिक 'देशदूत'ने याबाबत वृत्त प्रसिद्ध करताच निफाडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने रविवारी (दि.12) या रस्त्याचा प्रश्न अवघ्या चार तासांत मार्गी लावला. त्यामुळे स्थानिक शेतकर्यांनी आभार मानले.
निफाड-पिंपळगाव बसवंत रस्त्याचे ( Niphad- Pimpalgaon Basvant Road )आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून काम करण्यात आले. माजी आमदार अनिल कदम यांच्या पाठपुराव्यामुळे झालेल्या या रस्त्याचे रूंदीकरण करोना काळात झाले. त्यामुळे या रस्त्याचे ग्रहण कायमस्वरूपी थांबले. मात्र, दावचवाडी येथील साई लॉन्ससमोरील चारशे फुट रस्त्याचे काम कथित कारणांमुळे प्रलंबित होते. त्यामुळे स्थानिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत होता.
द्राक्षबागांसह इतर पिकांवर धुळीचा थर बसत असल्याने शेतकर्यांचे नुकसान व्हायचे. तर लॉन्समध्ये कार्यक्रमासाठी आलेल्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला होता. याबाबत दैनिक 'देशदूत'ने 3 जानेवारीच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केले होते. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाचे निफाडचे सहाय्यक कार्यकारी अभियंता गोसावी, सहाय्यक अभियंता आनंद पगारे यांनी कार्यवाही करीत रविवारी सकाळी साधनसामग्रीसह दावचवाडी गाठत कामाला सुरुवात केली. बघता बघता चार तासांत रस्ता चकाचक झाल्याने शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले.
रस्त्याचे काम रखडल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते होते. आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्ती केल्यामुळे अनेक वर्षांपासूनचा प्रश्न मिटला आहे.
किरण धुमाळ, संचालक, के.डी. असोसिएट
आम्ही अनेकदा पाठपुरावा केला होता. मात्र रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नव्हता. याबाबत बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना समस्यांची माहिती दिली. अखेर रविवारी हा प्रश्न मार्गी लागल्याने समाधान वाटते.
ज्ञानेश्वर चव्हाण, जिल्हा सरचिटणीस, काँग्रेस