Deshdoot News Impact : केसपेपरवरील जात काढा

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार यांची मागणी
Deshdoot News Impact : केसपेपरवरील जात काढा

मनमाड । प्रतिनिधी Manmad

येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी काढण्यात येत असलेल्या केसपेपरवरील बंधनकारक असलेला जातीचा कॉलम तसेच रूग्णांची जात विचारल्यानंतरच डॉक्टरांतर्फे उपचार केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार दै.‘देशदूत’ ने उघडकीस आणताच याची गंभीर दखल विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्यासह केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार यांनी गंभीर दखल घेतली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना व्टीट करत पुरोगामी महाराष्ट्रात असा प्रकार घडणे चुकीचे असून तातडीने केसपेपर वरील जात हा कॉलम हटविण्याची मागणी केली तर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी देखील या घटनेची गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले आहे.

मनमाड उपजिल्हा रुग्णालयात दररोज सर्व जाती धर्मांचे शेकडो रुग्ण उपचारासाठी येतात मात्र आता या रुग्णांना जातीपातीचा सामना करावा लागत आहे.

केस पेपरवर 9 कॉलम असून त्यात जात म्हणून एक कॉलम आहे. केस पेपर काढल्यानंतर तो घेऊन डॉक्टरकडे गेल्यानंतर हा कॉलम भरण्यासाठी डॉक्टर रुग्णाला त्याची जात विचारतात त्यानंतर त्याच्यावर उपचार केले जात आहे हा धक्कादायक प्रकार दै,‘देशदूत’ ने उघडकीस आणल्या नंतर एकच खळबळ उडाली होती.

आरपीआय, ठाकरे गट शिवसेना, अंनिस यासह इतर पक्ष आणि संघटनानी याचा तीव्र निषेध करून केस पेपरवर असलेला जात हा कॉलम हटविण्याची मागणी केली आहे. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील या घटनेची गंभीर दखल घेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीने ट्वीट करत शासकीय किंवा खासगी रुग्णालयात उपचारासाठी येणार्‍या कोणत्याही रुग्णाला त्याची जात विचारली जाऊ नये.

मनमाड उपजिल्हा रुग्णालयासह राज्यात अन्यत्र कुठेही असे प्रकार सुरु असतील तर ते तत्काळ थांबवावेत, ताबडतोब निर्देश द्यावेत अशी मागणी केली आहे. रुग्णालयात उपचारासाठी येणार्‍या रुग्णांना त्यांची जात विचारण्याचा प्रकार जातीभेदाला खतपाणी घालणारा, घटनाविरोधी असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटली असतांना उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी मात्र प्रसार माध्यमांना पाठविलेल्या पत्रात केस पेपर वरील जात हा कॉलम आर्थिक दुर्बल घटकांना आरोग्य सुविधा स्कीमचा फायदा देण्यासाठी असल्याचे म्हटले आहे.

मोठ्या आजाराच्या उपचारासाठी केंद्र सरकारने सर्वच शासकीय सोबत काही खासगी हॉस्पिटलमध्ये मोफत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत मात्र थंडी, ताप, खोकला यासारखे आजार कोणत्याही स्कीममध्ये बसत नसताना त्यांना देखील जात विचारली जात आहे हे कितपत योग्य आहे? असा प्रश्न संतप्त नागरीकांतर्फे उपस्थित केला जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com