देशदूत वृत्ताची दखल : आरोग्य उपसंचालकांचा पाहणीदौरा

देशदूत वृत्ताची दखल : आरोग्य उपसंचालकांचा पाहणीदौरा

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (National Health Campaigns ) दिंडोरी तालुक्यातील ( Dindori Taluka ) मोहाडी येथील परिचारिका प्रशिक्षण केंद्राची (Nursing Training Center- Mohadi )इमारत धूळ खात पडली असल्यामुळे ती इमारत प्रेमीयुगुल व मद्यपींचा अड्डा बनल्याबाबत ‘देशदूत’च्या बातमीन्वये आरोग्य उपसंचालक डॉ. रघुनाथ भोये (Deputy Director of Health Dr. Raghunath Bhoye )यांनी मोहाडी येथील परिचारिका प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन इमारतीबाबत सूचना केल्या.

दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे परिचारिका प्रशिक्षण केंद्राची उभारणी केली असली तरी ते प्रशिक्षण केंद्र केव्हा सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ज्या हेतूने हे प्रशिक्षण केंद्र सुरू होत होते तो हेतू साध्य होत नसल्याने परिसरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. संबंधित अधिकार्‍यांनी या इमारतीची जबाबदारी घेऊन लवकरात लवकर प्रशिक्षण केंद्र सुरू करणे आवश्यक आहे. येथे पहारेकरीची नेमणूक होणे आवश्यक आहे.

जिल्हा परिषद, आरोग्य अधिकारी व संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी याकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. नाही तर अशा कोट्यवधीच्या निधीतून उभारण्यात आलेल्या इमारती धूळ खात पडून निधी वाया जाण्याची भीती होती. सुरू होण्याआधीच दुरुस्तीसाठी निधी मागण्याची वेळ येऊ नये, यासाठी वेळीच दखल घेतली जाणे आवश्यक आहे. तरी संबंधित अधिकार्‍यांनी आता यावर काही निर्णय घ्यावे या आशयाचे सविस्तर वृत्त ‘देशदूत’ने प्रसिद्ध करताच आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. रघुनाथ भोये यांनी दखल घेत संबंधित विभागाला 5 मेपर्यंत अल्टिमेटम दिला होता. 6 तारखेला स्वतः पाहणी करून काम अपुरे असल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा संबंधित अधिकार्‍यांना दिला होता.

आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. रघुनाथ भोये यांनी दखल घेत संबंधित विभागाला धारेवर धरत आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. सदरील इमारतीचे अपूर्ण काम असताना संबंधित ठेकेदारांकडून ती इमारत ताब्यात का घेण्यात आली, याबाबत त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना धारेवर धरले. 6 मे रोजी स्वत: उपसंचालक डॉ. रघुनाथ भोये हे परिचारिका प्रशिक्षण केंद्राला भेट देणार असून तोपर्यंत इमारतीचे सर्व काम पूर्ण करण्याचे आदेश देऊन अपुरे असल्यास कार्यवाहीचा इशारा दिला होता.

त्यानुसार आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. रघुनाथ भोये यांनी मोहाडी येथील परिचारिका प्रशिक्षण केंद्राला भेट देत इमारतीची पाहणी केली. यावेळी सर्व कामांची पाहणी करत तेथे सुरक्षारक्षक व सीसीटीव्ही कॅमेरे तसेच काचांना लोखंडी संरक्षण जाळी बसवण्याची सूचना डॉ. भोये यांनी केली. लवकरच या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण सुरू करण्यात येईल, असेही आश्वासन दिले. यावेळी जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकत्स डॉ. अशोक थोरात, वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल हाडपे, अभियंता भूषण देसले, मोहाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्पेश चोपडे, डॉ. कुशारे, आरोग्य सहाय्यक संतोष पवार आदी उपस्थित होते.

आरोग्य उपसंचालकांकडून ‘देशदूत’चे आभार

आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. रघुनाथ भोये हे मोहाडी येथील परिचारिका प्रशिक्षण केंद्राला भेट देताच संबंधित अधिकार्‍यांची धावपळ उडाली होती. परंतु सुंदर इमारत बघून आरोग्य उपसंचालक डॉ. भोये यांनी समाधान व्यक्त केले. सुंदर इमारत धूळ खात पडली असल्याबाबत ‘देशदूत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून वरिष्ठ पातळीच्या निदर्शनास आणून दिले त्याबद्दल उपसंचालक डॉ. रघुनाथ भोये यांनी ‘देशदूत’चेही आभार मानले.

मोहाडी येथील परिचारिका प्रशिक्षण केंद्र प्रेमीयुगुल व मद्यपींचा अड्डा बनल्याचे वृत्त ‘देशदूत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेण्यास वरिष्ठ अधिकार्‍यांना भाग पडले आहे. मोहाडीमध्ये परिचारिका प्रशिक्षण केंद्राची इमारत उभी राहिल्याने आरोग्याच्या दृष्टीने त्याचा फायदा परिसरातील गावांना होणार आहे. तसेच ‘देशदूत’ने याबाबत संबंधित विभागांना जाग आणून देऊन या समस्या सोडवल्याबद्दल मी ‘देशदूत’चे आभार मानतो.

अमोल देशमुख, ग्रामस्थ मोहाडी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com