Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यादेशदूत गुणवंत गौरव सोहळा २०२२ : सभ्यता, संस्कृती हीच भारताची ताकद...

देशदूत गुणवंत गौरव सोहळा २०२२ : सभ्यता, संस्कृती हीच भारताची ताकद – ले.कर्नल(नि.) मनोजकुमार सिन्हा

नाशिक । विशेष प्रतिनिधी Nashik

भारताला सभ्यता, शूरता आणि संस्कृतीचा (Civilization, bravery and culture of India) समृद्ध वारसा लाभला आहे. भारताचे पूर्वज महान योद्धे होते. त्यांनी मानवी मूल्ये, धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी लढा दिला. भारतासारखी संस्कृती जगात नाही. सभ्यता आणि संस्कृती हीच भारताची खरी ताकद आहे, अशा शब्दांत लेफ्टनन्ट कर्नल(नि.) मनोजकुमार सिन्हा ( Lt. Col( Ret). Manoj Kumar Sinha)यांनी भारतीय संस्कृतीबद्दल गौरवोद‍्गार काढले.

- Advertisement -

दैनिक ‘देशदूत’च्या 53 व्या वर्धापनदिनानिमित्त ( Deshdoot 53rd Anniversary ) ‘देशदूत गुणवंत सोहळा’ ( Deshdoot Gunvant Gaurav Sohla-2022 ) आज येथील परशुराम सायखेडकर नाट्यगृहात मोठ्या दिमाखात पार पडला. गुणवंत गौरवानंतर प्रमुख पाहुणे लेफ्टनन्ट कर्नल(नि.) मनोजकुमार सिन्हा यांनी प्रभावी शैलीत उद्बोधक विचार मांडले.

व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम ( Senior Actor Shivaji Satam ), ‘देशदूत’ वृत्तसमुहाचे अध्यक्ष विक्रम सारडा आणि कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले विराजमान होते. ‘देशदूत गुणवंत गौरव’ सोहळ्याला वर्षानुवर्षे नाशिककर रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. आजच्या कार्यक्रमातही त्याची प्रचिती आली. यावेळी श्रोत्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून ‘देशदूत’वरील प्रेम, आपुलकी आणि विश्‍वास व्यक्त केला.

कर्नल सिन्हा यांनी आपल्या जोशभर्‍या भाषणात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा उल्लेख करताना भारताची उत्तुंगता आणि भव्यतेचा सार्थ शब्दांत गौरव केला. आमच्या पूर्वजांनी ज्ञान, कला, विज्ञान, अध्यात्म अशा अनेक विषयांत मिळवलेले यश अद्भूत आहे. एवढे यश आणि विविधतापूर्ण ज्ञानसमृद्धी जगाशी तुलना करता भारताखेरीज इतरत्र कुठेही आढळत नाही. देशासाठी ही गौरवशाली बाब आहे, असे त्यांनी सांगितले. इंटरनेटवर जगातील स्वातंत्र्य योद्धांबद्दल ‘गुगल’वर माहिती शोधण्याचा प्रयत्न केल्यावर एकट्या भारताविषयी मुबलक माहिती मिळाली. धर्म आणि सभ्यतेसाठी लढलेल्या योद्यांमध्ये तब्बल 25 भारतीय महिलांची नावे समोर आली. योद्यांमध्ये 43 नावे एकट्या महाराष्ट्रातील आहेत, असे सिन्हा म्हणाले.

भारतीय स्वातंत्र्याने 75 वर्षे पूर्ण केली आहेत. त्याबद्दल स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत आहे. यंदाच्या स्वातंत्र्यदिनी हा अमृतमहोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यलढा जिंकल्याबद्दल दरवर्षी आम्ही पुन:पुन्हा विजयोत्सव साजरा करतो. आजची पिढी देशाच्या स्वातंत्र्याला खेळ म्हणून तर समजत नाही ना? असे सांगून स्वातंत्र्यदिनाच्या उत्साही स्वरुपाबद्दल कर्नल सिन्हा यांनी खंत व्यक्त केली.

लोकांमधील स्वातंत्र्याविषयीच्या समजाविषयी त्यांनी शंकाही उपस्थित केली. समाजात राहून स्वत:ची उन्नती करताना समाजासाठी आणि देशासाठी आपापल्या क्षेत्रात कार्य करणार्‍या गुणी जनांना शोधून त्यांचा गौरव करण्याचा ‘देशदूत’चा उपक्रम इतरांना प्रेरणादायी आहे, अशा शब्दांत कर्नल सिन्हा यांनी ‘देशदूत’ गुणवंत सोहळ्याचे कौतुक केले.

प्रारंभी डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी प्रास्ताविकात ‘देशदूत’च्या गौरवशाली वाटचालीचा आढावा घेऊन श्रोत्यांना अवगत केले. विक्रम सारडा यांनी प्रमुख पाहुणे मनोजकुमार सिन्हा आणि शिवाजी साटम यांना युवा चित्रकार खरोटे यांनी रेखाटलेल्या त्यांच्याच प्रतिमा आणि शाल-श्रीफळ देऊन स्वागत आणि सन्मान केला. त्यानंतर गुणवंत गौरव सोहळा निवड समिती सदस्य उद्योजक हेमंत राठी, ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. निवड समिती सदस्यांच्या वतीने हेमंत राठी यांनी मनोगत व्यक्त केले. पुरस्कारार्थीच्या वतीने विश्‍वजित मोरे यांनी भावना व्यक्त केल्या. जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील 17 गुणवंतांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमास ‘देशदूत’चे वरिष्ठ संचालक रामेश्‍वर सारडा, व्यवस्थापकीय संचालक जनक सारडा, प्रशांत साठे, पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, अ‍ॅड.नंदकिशोर भुतडा, आर्कि.संजय पाटील, डी. जे. हंसवानी, जे. जे. पवार, मविप्र सरचिटणीस नितीन ठाकरे, विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन चिन्मय खेडेकर यांनी केले. ‘देशदूत’चे कार्मिक व्यवस्थापक सुनील ठाकूर यांनी आभार मानले.

‘देशदूत’ वटवृक्ष बहरत राहो : साटम

ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांनी आपल्या मनोगतात ‘देशदूत’च्या गुणवंत गौरव सोहळ्याची प्रशंसा केली. मला या सोहळ्यानिमित्त प्रमुख पाहुणा म्हणून मान्यवरांसोबत व्यासपीठावर विराजमान होण्याची दुर्लभ संधी मिळाली. लहान मुलांपासून ज्येष्ठ शेतकर्‍यापर्यंत विविध क्षेत्रातील मोठी आणि प्रतिभावान माणसे पाहता आली, त्यांचा गौरव करण्याचे भाग्य मला लाभले याचा मनस्वी आनंद होतो, अशा भावना साटम यांनी व्यक्त केल्या.

माझ्यासारख्या अभिनेत्याला लिहून दिलेले पाठ केल्याशिवाय बोलता येत नाही, पण ‘देशदूत’च्या आजच्या सोहळ्याने मी कृतकृत्य झालो आहे. नाशिकला आल्यावर मी ‘देशदूत’चे अंक पाहिले. इंग्रजी आवृत्तीही पाहिली. डिजिटल अंकही पाहिला. 53 वर्षे पूर्ण करणारा ‘देशदूत’ने पुढील 500 वर्षे साजरी करावीत इतका हा गोड पेपर आहे. ‘देशदूत’चा विस्तार वटवृक्षासारखा झाला आहे. अजूनही तो बहरत आहे. यापुढेही तो असाच बहरत राहो, अशा सदिच्छा साटम यांनी व्यक्त केल्या.

एक लडाई खतम हुई…!

लेफ्टनन्ट कर्नल(नि) मनोजकुमार सिन्हा यांनी युद्धाविषयीचे वास्तव सांगितले. सैन्यात असताना सैनिकांना दोन प्रकारच्या युद्धाला सामोरे जावे लागते. एक प्रत्यक्ष सीमेवर शत्रूशी लढावे लागते. युद्धात जिंकल्यानंतर लढताना जखमी झाल्यावर जीवन-मृत्यूची लढाई सुरू होते. सुदैवाने मी दोन्हीही लढाया जिंकल्या आहेत, असे सांगून कर्नल सिन्हा यांनी स्वानुभवावर लिहिलेली जोशपूर्ण कविता पहाडी आवाजात सादर केली. युद्धात मिळवलेला विजय, युद्धावेळी जखमी झाल्यावर सुरू झालेली मृत्युशी झुंज आणि त्यात मिळवलेल्या विजयाची गाथा सांगणारी ‘एक लडाई खत्म हुई, दुसरी लडाई शुरू हुई…।’ ही त्यांची कविता श्रोत्यांची दाद मिळवून गेली.

गुणीजनांचा गौरव

देशदूत गुणवंंत सोहळ्यात कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ कार्यकर्ते माधवराव बर्वे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. उद्येाजक राजेंंद्र बागवे, नवउद्योजक विश्वजित मोरे, उपक्रमशील शिक्षक खंडू मोरे, संजय गुंजाळ, केशव गावित, क्रीडा शिक्षक दिनेेश पागी, क्रीडापटू निकिता काळे, तनिषा कोटेचा, पर्यावरण क्षेत्रात वन्यजीवांसाठी उत्कृष्ट कार्य करणारे वैभव भोगले, सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले सनय फौंडेशनचे निलेश गायकवाड, रोहीत जाधव, बोरगावसारख्या आदिवासी भागात महिला सक्षमीकरणाचा विडा उचललेला स्ट्रॉबेरी स्वयंसहायता बचतगट, आरोग्य क्षेत्रातील अरुणा पाटील, साहित्यिक स्वानंद बेदरकर, विशेष कर्तृत्व सिध्द् करणारे अमोल जागले, आम्रपाली पगारे यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या