देवळा कृउबा निवडणुकीचा निकाल जाहीर; कोणी उधळला गुलाल?, वाचा सविस्तर

देवळा कृउबा निवडणुकीचा निकाल जाहीर; कोणी उधळला गुलाल?, वाचा सविस्तर
USER

देवळा | प्रतिनिधी Deola

तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी विकास पॅनल ने १८ पैकी १७ जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले. तर आपल्याच नेत्यांविरोधात लोकमान्य शेतकरी पॅनल ने तीन जागा लढवत नेत्यांना चांगलाच घाम फोडला. त्याच बरोबर हमाल तोलारी गटात दोन्ही उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी करत एकमेकांविरुद्ध लढत दिली. शुक्रवार (ता.२८) रोजी देवळा बाजार समितीच्या १० जागांसाठी झालेल्या मतदानात १०४३ पैकी १०१७ मतदारांनी मतदान केल्याने ९७.५० टक्के मतदान झाले. मतदानानंतर लगेचच झालेल्या मतमोजणीत शेतकरी विकास पॅनेलच्या बाजूने निकाल लागल्याने कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी केली.

या निवडणुकीत तालुका पत्रकार संघाच्या वतीने सर्वपक्षीय उमेदवारांना एकत्रित आणत निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला असता माजी सभापती केदा आहेर व माजी सभापती योगेश आहेर यांच्या माध्यमातून १८ पैकी आठ जागा बिनविरोध करण्यात यश मिळाले होते. तर काही उमेदवारांमध्ये एकमत न झाल्याने उर्वरित दहा जागांसाठी १८ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम राहिले. त्यात सोसायटी गटाच्या सात जागांसाठी १३ उमेदवार तर व्यापारी गटात २ जागांसाठी ३ व हमाल तोलारी (मापारी) गटासाठी समोरासमोर लढत झाली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा..

भाजपा व महाविकास आघाडी यांनी शेतकरी विकास पॅनल ची निर्मिती करून सोसायटी गटात सात व व्यापारी गटात दोन असे नऊ उमेदवार रिंगणात उतरवले होते. तर याच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येत सोसायटी गटाच्या सात जागांसाठी तीन उमेदवारांनी एकत्रित येत लोकमान्य शेतकरी पॅनल उभे केले होते. इतर तीन उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी केली असली तरी शेतकरी विकास पॅनलला जाहीर पाठिंबा दिला होता.

शेतकरी विकास पॅनल कडे मतदारांचे संख्याबळ जास्त होते, मात्र एका जागेचा तिढा न सुटल्याने कार्यकर्त्यांनीच नेत्यांच्या विरुद्ध बंड पुकारून निवडणूक प्रक्रिया राबविण्यात भाग पाडले. दरम्यान आज शुक्रवार ता.२८ रोजी या निवडणुकीसाठीच्या मतदान प्रक्रियेत सोसायटी गटातील ५१० पैकी ५०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर व्यापारी मतदारसंघात ४३७ पैकी ४२३ व हमाल व्यापारी मध्ये ९६ पैकी ९४ मतदारांनी मतदान केले.

दिवसभर झालेल्या मतदान प्रक्रियेच्या वेळी सकाळपासून उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते मतदान केंद्राजवळ ठाण मांडून होते. लोकमान्य शेतकरी पॅनलच्या तीन उमेदवारांनी मोठे आव्हान उभे केल्याने शेतकरी विकास पॅनलाला चांगलीच कसरत करावी लागली. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी येथील मतदान केंद्र यांना भेट देत मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुजय पोटे यांनी कामकाज पाहिले. तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून शरद दराडे सचिव माणिक निकम सहकार्य केले. पोलीस निरीक्षक समीर बारावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

मतदानानंतर लगेचच मतमोजणी करण्यात आली. सोसायटी गटातील शेतकरी विकास पॅनलचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते

शिवाजी दोधा आहिरे - ३२१, योगेश शांताराम आहेर - ४०५ अभिजित पंडितराव निकम- २८७, भाऊसाहेब निंबा पगार- ३७३,अभिमन वसंत पवार - ३५८, शिवाजीराव भिका पवार - ३३६ विजय जिभाऊ सोनवणे - ३६२

तर लोकमान्य शेतकरी पपॅनलचे पराभूत उमेदवार महेंद्र बळवंत निकम यांना २००, शशिकांत श्रीधर निकम २३८, वसंत राजाराम सुर्यवंशी १७५ मते मिळवत चांगली टक्कर दिली.

व्यापारी गटातील विजयी उमेदवार

निंबा वसंत धामणे - ३२९, संजय दादाजी शिंदे - ३६५

हमाल मापारी गटात भाऊराव बाबुराव नवले- ५७

दरम्यान बिनविरोध झालेल्या उमेदवारांची नावे याप्रमाणे आहेत. सोसायटी सहकारी संस्थेच्या मतदारसंघात महिला राखीव जागेवर धनश्री केदा आहेर व विशाखा दीपक पवार यांची तसेच इतर मागास वर्ग गटात दिलीप लालजी पाटील आणि विजा-भज मध्ये दीपक काशिनाथ बच्छाव यांची बिनविरोध निवड झाली. याशिवाय ग्रामपंचायत मतदारसंघातील चारही जागा बिनविरोध झाल्या. त्यात सर्वसाधारणमध्ये रेश्मा रमेश महाजन व शाहू गंगाधर शिरसाठ, अनुसूचित जाती व जमाती मध्ये भास्कर बाबुराव माळी तर आर्थिक दुर्बल गटात शीतल योगेश गुंजाळ यांची बिनविरोध निवड झालेली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा..

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com