…अखेर अनुराधा सिनेमागृह जमीनदोस्त; जाणून घ्या ४७ वर्षांचा इतिहास

jalgaon-digital
3 Min Read

नाशिकरोड | दिगंबर शहाणे | Nashikroad

एकेकाळी उत्तर महाराष्ट्राचे (Maharashtra) गौरवस्थान म्हणून समजले जाणारे व सुमारे 47 वर्षाचा इतिहास असलेले नाशिककरांचे आवडते असे येथील अनुराधा सिनेमागृहाला (Anuradha Theatre) अखेर आजपासून पाडण्यास सुरुवात करण्यात आली आहे…

या ठिकाणी लवकरच व्यावसायिक संकुल उभारले जाण्याची शक्यता आहे. अनुराधा सिनेमागृह (Anuradha Theatre) हे नाशिककरांचेच नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील आवडते सिनेमागृह म्हणून ओळखले जात होते. उत्तर महाराष्ट्रातील पहिलेच असलेले वातानुकूलित सिनेमागृह म्हणून अनुराधाची ओळख होती.

अनुराधा सिनेमागृह उत्तर महाराष्ट्राचे गौरवस्था म्हणून ओळखले जात होते. 1975 साली गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर राजकुमार कोहली (Rajkumar Kohli) दिग्दर्शित व सुनील दत्त (Sunil Datta), जितेंद्र (Jitendra), रीना राय (Reena Rai) यासारखे कलाकार असलेला नागिन (Nagin) या चित्रपटाने या सिनेमागृहाचा शुभारंभ झाला होता.

त्यासाठी उद्घाटनाला स्वतः दिग्दर्शक राजकुमार कोहली, सिने अभिनेते सुनील दत्त, रीना राय, जितेंद्र हे सिने कलाकार उपस्थित होते. सुरुवातीला या चित्रपटगृहाचे रोज 5 शो दाखविले जात असत. सकाळी दहा वाजता इंग्रजी चित्रपट, दुपारी बारा वाजता मॅटिनी चित्रपट व नंतर 3 शो असे एकूण पाच शो दाखविले जात असत.

त्याकाळी अनुराधा सिनेमागृहात प्रत्येक शो हाउसफुल असायचा. या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रातून सिने रसिक केवळ चित्रपटगृह बघण्यासाठी येत असत. त्या काळात मुंबई बरोबर अनुराधा सिनेमागृहात चित्रपट प्रदर्शित होत असत.

चित्रपटगृहात दादा कोंडके (Dada Kondke) यांचे प्रत्येक चित्रपट किमान 16 आठवडे मुक्काम करीत असत. त्यानंतर हिंदी चित्रपटापैकी फिरोज खान यांचा कुर्बानी जितेंद्र कलाकार असलेला मेरी आवाज सुनो या चित्रपटाचे 5 शो होत असत.

मनोज कुमार, हेमा मालिनी यांचा दस नंबरी हा चित्रपट सुद्धा दहा आठवड्याचा त्याचप्रमाणे जितेंद्र यांचा आशा हा चित्रपट सुद्धा दहा आठवडे सुरू होता. अशा अनेक चित्रपटांनी अनुराधा सिनेमागृह गाजले होते.

1990 नंतर घरोघरी टीव्ही आल्याने दूरदर्शन मालिका सुरू झाल्या व चित्रपट सुद्धा दूरदर्शनवर नागरिक बघत होते. त्यामुळे त्याचा परिणाम चित्रपट गृहावरती झाला. परिणामी त्यानंतर सिनेमागृह प्रेक्षकाविना ओस पडू लागले.

नाशिक शहरातील अनेक चित्रपट गृह त्यामुळे बंद पडली. त्यात नाशिकरोड येथील रेजिमेंटल व बिटको चित्रपटगृहाचा समावेश होता. एक मे 2015 साली अनुराधा सिनेमागृह बंद करण्यात आले.

तीन वर्षांपूर्वी या चित्रपटगृहाला मोठी आग सुद्धा लागली होती. गेल्या सात वर्षापासून बंद असलेले सिनेमागृह अखेर आजपासून पाडण्यास सुरुवात केली आहे. या ठिकाणी लवकरच व्यावसायिक संकुल उभारले जाण्याची शक्यता आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *