द्राक्ष उत्पादकांचे कृषी मंत्र्यांना साकडे
मुख्य बातम्या

द्राक्ष उत्पादकांचे कृषी मंत्र्यांना साकडे

करोनाच्या जाचक नियमांतून वगळावे

Abhay Puntambekar

सटाणा । प्रतिनिधी Satana

करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या नियमांतून द्राक्ष निर्यात तसेच कोल्ड स्टोरेज पॅकिंग आदी बाबींना वगळल्यास उत्पादकांना द्राक्ष निर्यात करता येणार आहे. गतवर्षी अवकाळी व अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. त्यामुळे नियमातून वगळून दिलासा द्यावा, असे साकडे द्राक्ष उत्पादकांनी कृषिमंत्री दादा भुसे यांना घातले.

येथील पंचायत समिती सभागृहात कृषिमंत्री दादा भुसे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तालुक्यातील पूर्व हंगामी द्राक्ष उत्पादकांच्या व्यथा बैठकीत जाणून घेतल्या. यावेळी द्राक्ष उत्पादकांनी कृषिमंत्र्यांसमोर विविध समस्या व अडचणी मांडल्या. आ. दिलीप बोरसे यावेळी उपस्थित होते. या ऑनलाईन बैठकीसाठी कृषी सचिव एकनाथ डवले यांच्यासह कृषी विभाग, अपेडा विपणन विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसह खंडेराव शेवाळे, कृष्णा भामरे, जिभाऊ कापडणीस, केशव मांडवडे, नीलेश चव्हाण, प्रकाश शेवाळे आदींसह द्राक्ष उत्पादक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

बागलाण तालुक्यातून पूर्व हंगामी द्राक्ष प्रामुख्याने रशिया, सौदी अरेबिया, श्रीलंका व बांगलादेश या आखाती देशांमध्ये निर्यात होतात. करोनाचा उद्रेक सुरू असल्यामुळे छाटणीनंतर उत्पादित पूर्वहंगामी द्राक्ष निर्यात होतील किंवा नाही याची संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. मार्च महिन्यापासून लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे यंदा द्राक्ष कवडीमोल किमतीत विकावे लागल्याने उत्पादकांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.

विषाणूचे संक्रमण सुरूच असल्यामुळे आगामी काळातदेखील अशीच परिस्थिती राहिल्यास मोठे आर्थिक नुकसान पुन्हा सहन करावे लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर द्राक्ष उत्पादकांनी कृषिमंत्री भुसे यांना करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्माण केलेल्या नियमांतून द्राक्ष निर्यात तसेच कोल्ड स्टोरेज व पॅकिंग हाऊस आदी बाबी वगळण्यात याव्यात. त्यामुळे द्राक्ष निर्यात करणे सुलभ होऊन आर्थिक नुकसान टळणार असल्याकडे शेतकर्‍यांनी लक्ष वेधले.

ना.भुसेंसह कृषी सचिव एकनाथ डवले यांनी द्राक्ष उत्पादकांनी मांडलेल्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत यासंदर्भात मंत्रालयस्तरावर काम सुरू असल्याचे संकेत दिले. पूर्वहंगामी द्राक्षांसाठी हवामान आधारित पीकविमा लागू करण्याची मागणी उत्पादकांनी केली आहे. यासंदर्भातदेखील शासनस्तरावर विचारविनिमय सुरू असून लवकरच तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही देत कृषिमंत्री भुसे यांनी पूर्वहंगामी द्राक्ष निर्यातीबाबत पुढील धोरण ठरवण्यासाठी अपेडाचे अधिकारी, निर्यातदार यांच्यासोबत लवकरच बैठक घेतली जाईल, असे आश्वासन दिले.

क्रॉप कव्हर-नेट अनुदानातून मिळावे

पूर्वहंगामी द्राक्ष आखाती देशांमध्ये निर्यात केले जातात. निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनासाठी मोठा खर्च शेतकर्‍यांना करावा लागतो. गतवर्षी अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे बागलाण तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला होता. त्यामुळे द्राक्ष क्रॉप कव्हर किंवा नेट अनुदान तत्त्वावर तसेच हवामानावर आधारित पीकविमा योजना राज्य शासनातर्फे सुरू करण्यात यावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली असता याबाबत शासन निश्चित सकारात्मक निर्णय घेईल, असे आश्वासन कृषिमंत्री भुसे यांनी शेतकर्‍यांना दिले.

Deshdoot
www.deshdoot.com