
नवीन नाशिक । निशिकांत पाटील New Nashik
नवीन नाशिक परिसरातील सर्वात मोठ्या दोन प्रकल्पांचे काम कित्येक वर्षांपासून रखडले होते. गेल्या महिन्यातच छत्रपती शिवाजी महाराज सेंट्रल पार्कसाठी आ.सिमा हिरे यांनी 18 कोटी रुपयांचा निधी आणून त्याच्या कामाला गती मिळाली. त्यासोबतच सुरु असलेल्या राजे संभाजी स्टेडियमच्या कामासाठी आ. हिरे यांनी सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडून स्टेडियमच्या कामाला गती मिळवून द्यावी अशी मागणी नवीन नाशिककरांमधून सर्वत्र होत आहे.
नवीन नाशकातील सर्वात मोठ्या खदानींवर सुमारे 438 गुंठे जागेत वसलेल्या राजे संभाजी स्टेडियमच्या विस्तारीकरणासाठी 20 वर्षानंतर मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला होता. मात्र अनेक अडचणींमुळे रखडलेले राजे संभाजी स्टेडियमचे काम सुरु झाले. मात्र अद्यापही ते पूर्णत्वास न आल्याने क्रीडाप्रेमींनी नाराजीचा सूर व्यक्त केला आहे. गेल्या सुमारे 22 ते 25 वर्षांपूर्वी शहरातील घंटागाडी ठेकेदार सध्याच्या राजे संभाजी स्टेडियमच्या जागी असलेल्या खदानीत शहरातील कचरा टाकत असे. त्यामुळे या परिसरात सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेलेे असायचे.त्यामुळे येथील अनेक रहिवाशानी तर मिळेल त्या भावात आपली राहती घरे , बंगले मिळेल त्या भावात विक्री केले होते. अशा परिस्थितीत त्यावेळचे नगरसेवक मामा ठाकरे यांनी मनपा प्रशासनाकडून संबंधित खदान बुजवून त्याठिकाणी क्रीडासंकुल उभे करण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला .
या कामासाठी सुमारे 2.5 कोटी रुपयांचा निधी मनपाने मंजूर केला होता. 1998-99 मध्ये तत्कालीन महापौर अशोक दिवे यांच्या हस्ते या क्रीडा संकुलाचे भूमिपूजन करण्यात आले. पडीत खदानीला भव्य असे राजे संभाजी स्टेडियम असे नामकरण करण्यात आले. नवीन नाशिक परिसरातील एकमेव मोठे असे इनडोअर व आउटडोअर स्टेडियम म्हणून या स्टेडियमची ओळख झाली.
लक्ष्यवेधी मांडा
सध्या पावसाळी अधिवेशन सुरु असून नाशिकच्या सर्वच आमदारांनी नाशिकचे प्रश्न लक्षवेधीमध्ये मांडले होते. नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांनी राजे संभाजी स्टेडियमचा प्रश्न लक्षवेधीमध्ये मांडून सदर प्रकल्पाचे रखडलेले काम पुन्हा सुरु करावे अशी मागणी नवीन नाशिककरांसह क्रीडा प्रेमींमध्ये जोर धरू लागली आहे.
केंद्र सरकारकडून 6 कोटी निधी
राजे संभाजी स्टेडियमच्या विस्तारासाठी सुमारे तब्बल 20 वर्षानंतर खेलो इंडिया खेलो योजनेअंतर्गत राजे संभाजी स्टेडियमच्या विस्तारीकरणासाठी केंद्र सरकारकडून 6 कोटी रुपयांची मंजुरी मिळाल्याने क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. मात्र येथे काम करीत असलेल्या ठेकेदाराला आलेल्या वैयक्तिक अडचणीमुळे येथील काम बंद पडले होते .
आंदोलनापुरते काम सुरू
या प्रभागाच्या माजी नगरसेविका किरण दराडे व त्यांचे पती बाळा दराडे यांनी सदर काम सुरु करण्याकरिता राजे संभाजी स्टेडियम येथेच उपोषण केल्याने येथील काम सुरु झाले होते.मात्र सद्यपरिस्थितीत याठिकाणी दुर्लक्ष झाल्याने क्रीडाप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.