Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याऔद्योगिक क्षेत्रात कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी

औद्योगिक क्षेत्रात कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी

सातपूर । प्रतिनिधी

औद्योगिक क्षेत्रात करोना चाचण्या आणि लसीकरण मोहीम हाती घेण्यात यावी. तसेच करोना उपचार केंद्रे उभारावीत. याकामी मदत देण्यास उद्योग संघटना सज्ज आहेत, असे अभिवचन उद्योजकांनी आजच्या बैठकीत दिले.

- Advertisement -

उद्योगांच्या उत्पादन कामाच्या ठिकाणी करोना रोखण्यासाठी केल्या जाणार्‍या उपाययोजनांची माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

बैठकीत विविध औद्योगिक संघटनांसह मोठ्या उद्योगांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. करोना रुग्णांना ऑक्सिजन पुरवण्यासाठी जिल्ह्यात ऑक्सिजन सिलिंडरची चणचण भासत असल्याचे प्रादेशिक अधिकारी गवळी यांनी बैठकीच्या सुरुवातीला सांगितले. जिल्हा उद्योग केंद्राकडून 1,250 सिलिंडर जमा करण्यात आले आहेत. याखेरीज उद्योगांकडे स्वतःची काही रिकामी सिलिंडर्स असल्यास ती त्यांनी मदतीसाठी द्यावीत, असे आवाहन गवळी यांनी केले.

चर्चेच्या दुसर्‍या फेरीत औद्योगिक क्षेत्रात महामारी रोखण्यासाठी केल्या जाणार्‍या उपाययोजनांचा आढावा प्रादेशिक अधिकारी गवळी यांनी घेतला. महिंद्रा, बॉश, सीएट आदी मोठ्या उद्योगांनी आपल्या कंपनी आवारात चाचण्या आणि लसीकरणाचे उपक्रम राबवले आहेत. सीएट कंपनीत लसीकरण अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले. नाईस कडूनदेखील औद्योगिक वसाहतीत तपासण्या आणि लसीकरण केंद्र उभारण्याची तयारी दाखवण्यात आली.

अंबड औद्योगिक वसाहतीतील आयटी पार्क इमारत रिक्त असून तेथे आयमा तयार आहे. ऑक्सिजन व व्हेंटिलेटर सुविधा उपलब्ध करून मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. याबाबत जिल्हाधिकार्‍यांची चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे नितीन गवळी यांनी सांगितले. बैठकीला आयमा, नाईस, नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर, भाजप उद्योग आघाडी, महिंद्रा, बॉश, सीएट यासह उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या