
नाशिक । प्रतिनिधी Nashik
मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनमुळे नाशिकसह राज्यातील 11 जिल्ह्यांच्या विकासाला चालना मिळणार असून, या विषयीचा डीपीआर वर्षभरापूर्वीच तयार झालेला असल्याने प्रास्तावित रेल्वे मार्गाला केंद्राकडून मान्यता मिळवून लवकरात लवकर प्रकल्प उभारणीला प्रारंभ करावा, अशी मागणी खा. हेमंत गोडसे यांनी नॅशनल हायस्पीड रेल कार्पोरेशन लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक प्रसाद यांच्याकडे केली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी देशभरात सात ठिकाणी बुलेट ट्रेन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये मुंबई - नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पाचा समावेश करण्यात आलेला आहे. मुंबई-नाशिक - नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्प राज्याच्या विकासासाठी वरदान ठरणार आहे. त्यामुळे मुंबई-नागपूर दरम्यानचा प्रवासाचा वेळ निम्म्यापेक्षा कमी होण्यासोबतच राज्यातील 10 जिल्ह्यांची कनेक्टिव्हिटी गतिमान होणार आहे.
सदर ट्रेनचा मार्ग नागपूर, वर्धा, पुरगांव, करंजा, मेहेकर, जालना, औरंगाबाद, शिर्डी, नाशिक, इगतपुरी मार्गे सीएसटी असा असणार असल्याचे खा. गोडसे यांनी सांगितले. या प्रकल्पाचा डीपीआरही पूर्ण झालेला आहे. मात्र त्या प्रकल्पाच्या केंद्राकडून अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहे.
सदर बुलेट ट्रेन उभारणीला गती देण्याची मागणी खा. गोडसे यांनी दिल्लीतील नॅशनल हायस्पीड रेल कार्पोरेशन लिमिटेडचे सीएमडी प्रसाद यांची भेट घेऊन त्यांना लक्ष घालण्याची विनंंती केली.