सोयाबीन उत्पादकांना अनुदान देण्याची मागणी

सोयाबीन उत्पादकांना अनुदान देण्याची मागणी

मुंबई | प्रतिनिधी ( Mumbai )

महाबीजने (Mahabeej ) सोयाबीन (Soybean ) बियाणाच्या किंमतीत २ हजारांनी वाढ केल्याने शेतकऱ्यांना मोठा भुर्दंड बसणार असल्याने राज्य शासनाने सोयाबीन उत्पादकांना प्रती एकर २ हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी भाजप किसान मोर्चाचे (BJP Kisan Morcha) राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. अनिल बोंडे ( Dr. Anil Bonde )यांनी केली.

विविध कारणांमुळे अडचणीत आलेल्या राज्यातील कांदा आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनाही राज्य सरकारने मदत, करावी अशी मागणीही त्यांनी केली.

गेल्या वर्षी सोयाबीन बियाणांच्या ३० किलोच्या पिशवीची किंमत २ हजार २०० रुपये होती. यावर्षी महाबीज या राज्य सरकारच्या बियाणे उत्पादक कंपनीने ३० किलोच्या पिशवीची किंमत ४ हजार २५० रुपये केल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

महाबीजने बियाणांच्या किमतीत वाढ केल्याने खासगी बियाणे कंपन्यांनीही दरवाढ केली आहे. सामान्य शेतकरी बियाणांच्या किमतीतील जवळपास दुप्पट वाढ सहन करू शकणार नाही. काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने खतांच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर शेतकऱ्यांना अनुदान दिले होते. त्याच पद्धतीने राज्यातील आघाडी सरकारने सोयाबीन उत्पादकांच्या बँक खात्यात प्रती एकर २ हजार रुपये अनुदान जमा करावे, असे डॉ. बोंडे म्हणाले.

यावर्षी राज्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले आहे. आघाडी सरकारने गेल्या २ वर्षांत कांदा साठवणुकीसाठी चाळी बांधण्यास अनुदान न दिल्याने शेतकरी कांदा साठवू शकत नसल्याने त्याला मिळेल त्या भावात कांद्याची विक्री करावी लागत आहे. फडणवीस सरकारने काही वर्षांपूर्वी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना २ रुपये प्रती किलो अनुदान दिले होते. आता आघाडी सरकारने ५ रुपये प्रती किलो अनुदान द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

विदर्भात संत्रा पिकाला यावर्षी मोठ्या प्रमाणात बहर आला होता. मात्र गेल्या ३ महिन्यापासून तापमानात प्रचंड वाढ झाल्याने मोठ्या प्रमाणात संत्रा पिकाला गळ झाल्याने ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना १ लाख रुपये प्रती हेक्टर इतके अनुदान देण्याची आवश्यकता आहे, असेही डॉ. बोंडे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com