Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याIPL-2021: दिल्लीचा पंजाबवर विजय

IPL-2021: दिल्लीचा पंजाबवर विजय

मुंबई ।वृत्तसंस्था

पंजाब किंग्सच्या 195 धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. आक्रमक मूडमध्ये असलेल्या पृथ्वी शॉला मोठी खेळी करता आली नाही. मात्र, शिखर धवनने ही उणीव भरून काढली. त्याने पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. शिखर धवन 49 चेंडूंत 13 चौकार व 2 षटकारांसह 92 धावांवर बाद झाला. पण, त्याने दिल्लीच्या विजयाचा पाया रचला होता. दिल्लीने हा सामना 6 विकेट्स राखून जिंकत गुणतालिकेत दुसर्‍या स्थानी आगेकूच केली. मुंबई इंडियन्सची तिसर्‍या स्थानी घसरण झाली.

- Advertisement -

पंजाबच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना पृथ्वी शॉ आणि शिखर धवन या दिल्लीच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. पहिल्या 5 षटकात दिल्लीने अर्धशतकी पल्ला गाठला. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात अर्शदीपने पृथ्वीला बाद करत दिल्लीला पहिला धक्का दिला. पृथ्वीने 17 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांसह 32 धावा केल्या. पॉवरप्लेमध्ये दिल्लीने 1 बाद 62 धावा केल्या. यानंतर शिखर धवनने स्टीव्ह स्मिथला सोबत घेत दिल्लीला शतकाजवळ नेले.

दरम्यान, धवनने 31 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. 11व्या षटकात दिल्लीने शंभरी गाठली, मात्र, शेवटच्या चेंडूवर मेरेडिथने स्मिथला तंबूचा रस्ता दाखवला. स्मिथला केवळ 9 धावा करता आल्या. त्यानंतर शतकाकडे कूच करणार्‍या धवनची रिचर्ड्सनने दांडी गुल केली. 15 षटकात दिल्लीने 3 बाद 152 धावा अशी मजल मारली. धवन बाद झाल्यानंतर कर्णधार ऋषभ पंत आणि मार्कस स्टॉइनिस यांनी छोटेखानी भागीदारी रचली. शेवटची 3 षटके बाकी असताना रिचर्ड्सनने पंतला बाद केले. त्यानंतर ललित यादव आणि स्टॉइनिस यांनी संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. स्टॉइनिसने 13 चेंडूत नाबाद 27 धावा केल्या. पंजाबकडून झाय रिचर्ड्सनला सर्वाधिक 2 बळी मिळाले.

तत्पूर्वी,बर्थडे बॉय केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी पंजाबच्या डावाची दमदार सुरुवात केली. 2 षटकात या दोघांनी पंजाबसाठी 25 धावा केल्या. दिल्लीसाठी पदार्पण केलेला वेगवान गोलंदाज लुकमान मेरीवालाच्या पहिल्या षटकात या दोघांनी 20 धावा ठोकल्या. मयंकनेही सुंदर फटके खेळत संघाची धावसंख्या वाढवली. पॉवरप्लेच्या 6 षटकात या दोघांनी 59 धावा उभारल्या. त्यानंतर मयंकने अर्धशतक साकारले. 10 षटकात पंजाबने बिनबाद 94 धावा उभारल्या. 13व्या षटकात दिल्लीला पहिले यश मिळाले.

मेरीवालाने स्थिरावलेल्या मयंकला बाद केले. मयंकने 36 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकारांसह 69 धावांची खेळी केली. मयंक-राहुलने पंजाबसाठी 122 धावांची भागीदारी उभारली.मयंक बाद झाल्यानंतर राहुलने आपले अर्धशतक पूर्ण केले. 16व्या षटकात राहुल रबाडाच्या गोलंदाजीवर झेलहाद झाला. राहुलने 7 चौकार आणि 2 षटकारांसह 61 धावांची खेळी केली. राहुलनंतर गेलही लवकर तंबूत परतला. वोक्सने त्याला बाद केले. गेल परतल्यानंतर दिल्लीने पंजाबला जास्त धावा काढू दिल्या नाहीत. पूरनही 19व्या षटकात स्वस्तात माघारी परतला. आवेश खानने त्याला बाद केले. शाहरुख खानने 20व्या षटकात केलेल्या फटकेबाजीमुळे पंजाब 195 धावांवर स्थिरावला.

- Advertisment -

ताज्या बातम्या