
नाशिक | प्रतिनिधी Nashik
नाशिक महापालिकेने( NMC) आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये उत्पन्नाबाबत ( income )केलेल्या नियोजनानुसार सध्या तरी महापालिका सुमारे 350 कोटी रुपये मागे चालत असल्याचे दिसून येत आहे. मार्च 2022 पर्यंत ही तूट कमी होण्याची शक्यता असली तरी इतर नियोजन करावे लागणार आहे. दरम्यान नाशिक महापालिकेच्या ठेवीत काही प्रमाणात वाढ होऊन ती 180 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे समजते.
नाशिक महापालिका दरवर्षी आपले उद्दिष्ट ठरवून घेते. त्यानुसार अपेक्षित उत्पन्न व खर्चाबाबत नियोजन करण्यात येते. चालू आर्थिक वर्षात मात्र मनपा मागे असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेचे उत्पन्नाचे मुख्य स्रोत म्हणजे घरपट्टी, पाणीपट्टी तसेच नगररचना विभागातून येणारे उत्पन्न आहे. मात्र आतापर्यंत शेकडो कोटी रुपयांची घरपट्टी, पाणीपट्टीची थकबाकी आहे.
नगररचना विभागाच्या ऑनलाईन, ऑफलाइन पद्धतीमुळे पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न मिळाले नसल्याचे जाणवत आहे. विशेष म्हणजे महापालिकेचे शहरातील विविध भागात असलेले 11 मोठे भूखंड महापालिका बीओटी तत्त्वावर देणार होती. त्यातून महापालिकेला सुमारे 200 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार होते, असा अंदाज गृहीत धरण्यात आला होता. मात्र काही कारणांनी तो विषय मार्गी लागला नाही.
दुसरीकडे 13 मार्च 2022 पासून नाशिक महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू झाल्याने तो विषय बाजूला गेला. म्हणून जे 200 कोटी रुपये येण्याची अपेक्षा होती ते महापालिकेला येत नाहीत तर इतर कारणांनी सुमारे दीडशे कोटी रुपये महापालिकेला मिळत नसल्याने महापालिकेला सुमारे 350 कोटी रुपयांची तूट जाणवत आहे.