डिफेन्स हबच्या घोषणा हवेतच

राजकीय उदासीनतेतून दोन विमान निर्मिती उद्योग राज्याबाहेर
डिफेन्स हबच्या घोषणा हवेतच

नाशिक । रवींद्र केडिया | Nashik

राज्यातील डिफेन्स हब (Defense Hub) तयार करण्याच्या बहुउद्देशिय प्रकल्पाला दोन मोठ्या उद्योगांच्या स्थानांतरणामुळे मोठा फटका बसला आहे. एचएएलसारखा (HAL) संरक्षण विमान कारखाना (Defense Aircraft Factory) राज्यात असताना दोन विमान कारखाने (Aircraft factory) राज्याबाहेर जाण्यातून राजकीय उदासीनता अधोरेखित होत आहे.

नजीकच्या काळात राज्यातून चार मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले. त्यांच्या जाण्याने राज्याच्या औद्योगिक विकासाची (Industrial development) मोठी हानी झालेली आहे. राज्यांतर्गत असलेल्या राजकीय अस्थिरतेच्या वातावरणासोबतच नेत्यांमधील आपापल्या प्रांतवादाचा परिणाम या उद्योगांच्या स्थलांतरावर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. राज्यातून वेदांता- फॉक्सकॉननंतर (Vedanta- Foxconn) बल्क ड्रग पार्क (Bulk Drug Park) आणि मध्यंतरी टाटा-एअरबसचा (Tata-Airbus) मोठा प्रकल्प गुजरातमध्ये (gujrat) हलवण्यात आला.

त्यातच आता नागपूरमधील (Nagpur) मिहानमध्ये प्रस्तावित असलेला फ्रान्सच्या सॅफ्रन प्रकल्पही (Saffron Project) राज्याबाहेर गेल्याने मिहानला डिफेन्स एव्हिएशन हब (Defense Aviation Hub) म्हणून विकसित करण्याचे स्वप्न भंग पावले. सरकारच्या दिरंगाईमुळे महाराष्ट्रात उभारला जाणारा सॅफ्रन प्रकल्प हैदराबादला स्थलांतरीत झाला आहे. ग्रुप ही फ्रेंच बहुराष्ट्रीय कंपनी आहे. ही कंपनी विमान तसेच रॉकेटचे इंजिन दुरुस्ती आणि देखभालीचे काम करते. 1 हजार 115 कोटी रुपयांची प्राथमिक गुंतवणूक असणारा हा प्रकल्प जमीन मिळण्यास दिरंगाई झाल्यामुळे हैदराबादला गेला आहे.

या प्रकल्पाच्या जाण्यामुळे राज्यातील सुमारे 500 ते 600 जणांंंचा रोजगार बुडाला. त्यासोबतच या उद्योगांना लागणार्‍या सिस्टीमच्या माध्यमातून कोट्यवधींच्या उलाढालीला व्यावसायिक मुकले आहेत. सॅफ्रन उद्योग नागपूरच्या मिहानमध्ये येण्यास उत्सुक होता. पण सरकारच्या दिरंगाईमुळे व महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरतेमुळे सॅफ्रन कंपनीने आपला प्रकल्प हैदराबादला हलवण्याचा निर्णय घेतल्याचे समोर येत आहे. एकापाठोपाठ चार मोठे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यामुळे राज्याच्या उद्योगक्षेत्राच्या विकासाच्या गतीला मोठा अडसर निर्माण झाला असल्याचे चित्र आहे.

मिहान येथे डिफेन्स इनोव्हेशन हबची उभारणी करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यकाळात झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात याला गती मिळाली नाही. मात्र ‘पुन्हा येत’ फडणविसांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या काळात राजकीय समिकरणांच्या खेळात हे प्रकल्प बाजूलाच पडले. किंबहुना यावर विचार करण्याला वेळच नाही. त्यामुळे नाशिकला डिफेन्स क्लस्टर उभारल्या जाणार्‍या दोन्ही ठिकाणच्या डिफेन्स प्रकल्पावर राजकीय कुरघोड्यांतून लक्ष दिले गेलेले दिसून येत नाही.

किंबहुना गेल्या चार ते पाच वर्षार्ंत या प्रकल्पांची स्थिती जैसे थे अशीच राहिल्याने उद्योगांच्या गुणवत्ता विकासाला व राज्याच्या डिफेन्स उत्पादन क्षमतेला प्रोत्साहन देण्याऐवजी गती रोखण्याचेच काम झालेले दिसून येते आहे. उद्योग उभारणीचे धोरण असलेल्या बहुराष्ट्रीय उद्योगांनी पोषक वातावरण असणार्‍या भागात आपले उद्योग उभारण्याची भूमिका स्वीकारणे योग्यच आहे. राज्यात हाती घेतलेल्या या संकल्पनावर काम न झाल्याने त्या केवळ घोषणाच राहिल्याचे दिसून येत आहे.

हा राजकीय डाव?

गुजरातमध्ये निवडणुका येत आहेत. त्यांना सामोरे जाण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मोठी खेळी केली असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. महाराष्ट्रातून मोठे प्रकल्प राज्यात ओढून आणत राज्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे चित्र निर्माण करण्याच्या दृष्टीनेच या उद्योगांचे स्थलांतर करण्यात आला असल्याचा तर्क उद्योजक व्यक्त करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com