राज्‍यात ओला दुष्‍काळ जाहीर करा - राज ठाकरे यांची मागणी

मुख्यमंत्र्यांना पत्र
राज्‍यात ओला दुष्‍काळ जाहीर करा - राज ठाकरे यांची मागणी

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ( MNS )राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. या मागणीमुळे सरकारवर ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी दबाव वाढला आहे.

राज्‍यात परतीच्या पावसाने कहर केला आहे. शेतक-याचे पीक डोळयादेखत वाहून गेले आहे. सरकारने पंचनाम्‍याचे आदेश दिले असले तरी तितकेसे पुरे नाही. त्‍यामुळे शेतक-याला दिलासा देण्यासाठी राज्‍यात ओला दुष्‍काळ जाहीर करावा,अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केली आहे.

या वर्षी मान्सूनचा मुक्‍काम लांबला. परतीच्या पावसाने तर कहर केला आहे. परतीच्या पावसाने तर खरीप पिकांचे अपरिमित नुकसान केले आहे. राज्‍यातील एकूणच हवामान पाहता आता रब्‍बी पिकाबद्दलही शेतकरी चिंतातूर आहे. ऐन पीक काढणीच्या वेळी पाऊस आल्‍याने शेतक-याच्या डोळयासमोर पीक वाया गेले. सरकारने यावर नुकसानीच्या पंचनाम्‍याचे आदेश दिले आहे. ते चांगलेच आहे. मात्र राज्‍यभरातील शेतक-यांचे झालेले नुकसान पाहता राज्‍य सरकारने ओला दुष्‍काळ जाहीर करावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी पत्रात केली आहे.

पंचनाम्‍याचे आदेश देण्यात आले असले तरी प्रशासकीय पातळीवर पंचनामे नीट होत नाहीत. खरा गरजू शेतकरी त्‍यामुळे उपेक्षितच राहतो. त्‍यामुळे सरकारने पंचनामे नीट व्हावेत. तसेच जी प्रतिहेक्‍टरी नुकसानभरपाई देण्यात येते ती देखील पुरेशी नसून तिचाही फेरविचार व्हावा, अशी सूचना राज यांनी केली आहे. लॉकडाऊन नंतर शेतकरी दिवाळी आनंदात साजरी करण्याच्या मनस्‍थितीत आहे. त्‍यामुळे त्‍याची दिवाळी आनंदात साजरी होईल याकडे सरकारने लक्ष द्यावे, असेही राज ठाकरे यांनी म्‍हटले आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवारी मागे घ्‍यावी यासाठी राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. भाजपने राज ठाकरे यांच्या या विनंतीचा मान राखला होता. आता ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत सरकार काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने अगदी कालपर्यंत युद्धपातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात मदत आणि पुनर्वसन तसेच कृषी विभागाला निर्देश देण्यात आले.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारने घेतला आहे. गेल्या काही दिवसात राज्यात परतीच्या पावसाचा फटका पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बसला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकामी विशेष लक्ष घालावे. पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देवून त्यांना दिलासा द्यावा, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com