टाळेबंदीचा निर्णय पक्का!

घोषणा बाकी, आज मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री बैठक
टाळेबंदीचा निर्णय पक्का!

मुंबई । वृत्तसंस्था

राज्यातील वाढत्या करोना संसर्गाने राज्य सरकारही सतर्क झाले आहे.संसर्ग साखळी तोडून वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी टाळेबंदी हाच सरकारपुढे एकमेव पर्याय आहे. त्यावर जवळपास निर्णय पक्का झाला असला तरी त्याची घोषणा अजून बाकी आहे.

त्याबाबत आणखी चर्चा करण्यासाठी दिवसभर बैठकांचे सत्र सुरूच राहणार आहे. टाळेबंदीबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जाहीर करण्याची शक्यता आहे. दरम्यान मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आज महत्त्वाची बैठक होत आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल करोना कृती दलाची विशेष बैठक बोलावली होती. बैठकीत टाळेबंदी किती दिवस लावायची यावर प्रामुख्याने चर्चा झाली. मुख्यमंत्री अर्थ खात्यासमवेत बैठक घेणार आहे. आज सकाळी 11 वाजता ही बैठक होणार असून उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्यासह काही वरिष्ठ अधिकारी या बैठकीत सहभागी होणार आहेत. टाळेबंदी लागू केल्यास अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार? या काळात गोरगरिबांना कालावधीत काही दिलासा देता येतो का? यावर महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे.

टाळेबंदी 14 दिवसांची?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्य कृतीदलाची बैठक बोलावली होती. या बैठकीत टाळेबंदी किती दिवस लावायचा यावर चर्चा झाली. कडक टाळेबंदी 7 दिवस करावी की 14 दिवस यावर चर्चा झाली. काहींच्या मते प्रथम 7 दिवस तर काही सदस्यांच्या मते 14 दिवस कडक टाळेबंदी जाहीर करावी, असा मतप्रवाह असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

एसओपीचे काम सुरू

गेल्या वर्षभरापासून करोनाशी लढताना सुविधा वाढवल्या. चाचण्या वाढवल्या. आरोग्याचे नियम पाळावेत यादृष्टीने मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. लोकांमध्येसुद्धा आता जागरूकता आली आहे.

सध्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. लक्षणे नसलेल्या व्यक्ती मोठ्या प्रमाणावर संसर्ग पसरवत आहेत. नियम पाळणार्‍यांना अशा लोकांमुळे धोका निर्माण झाला आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करून यासंदर्भात सर्वसमावेशक कार्य पद्धती (एसओपी) तयार करण्यात येत आहे. त्याचे कामही सुरू झाले आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com