Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक-बेळगाव विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय

नाशिक-बेळगाव विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय

देवळाली कॅम्प । वार्ताहर Devlali Camp

बेळगाव विमानसेवा सुरू करण्याच्या खा. हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. हैदराबाद, दिल्ली, पुणे, मंगळूर, अहमदाबाद या यशस्वी विमानसेनेनंतर आता ओझर येथून बेळगावसाठी विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय नागरी वाहतूक मंत्रालयाने घेतला आहे.

- Advertisement -

केंद्र शासनाच्या उड्डाण योजनेअंतर्गत येत्या 25 जानेवारीपासून नाशिक-बेळगाव विमानसेवा सुरू होणार आहे. या मार्गावरील विमानसेवेमुळे कोल्हापूर आणि गोवा येथे जाणे अगदीच सोपे होणार असून उद्योग व्यवसाय आणि पर्यटनाला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती खा.गोडसे यांनी दिली. या विमानसेवेमुळे बेळगाव येथून बायरोड कोल्हापूर आणि गोव्याला अवघ्या दीड ते दोनच तासात पोहोचणे शक्य होणार आहे.

उड्डाण योजनेअंतर्गत नाशिक शहर देशभरातील मोठ्या शहरांना जोडले जावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून खा. गोडसे प्रयत्नशील आहेत. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून नाशिक येथील ओझर विमानतळावरून हैदराबाद, दिल्ली, पुणे, बंगळुरू, अहमदाबाद या ठिकाणची विमानसेवा कार्यरत आहे.

नाशिक येथून कोल्हापूरच्या महालक्ष्मीला तसेच गोव्याला पर्यटनासाठी जाणार्‍यांची संख्या खूपच मोठी असल्याने नाशिक-बेळगाव यादरम्यानची विमानसेवा सुरू व्हावी यासाठी अनेकांनी खा.गोडसे यांच्याकडे आग्रही मागणी केली होती. येत्या 25 जानेवारीपासून सदरची विमानसेवा सुरू होणार असून या विमानाची आसन क्षमता 50 सीटची आहे.

पंचवीस सिटांसाठी तिकिटावर पन्नास टक्के सबसिडी असणार आहे. या विमानसेवेसाठी सुमारे बावीसशे ते पंचवीसशे रुपये तिकीट असणार आहे. आठवड्यातून तीन दिवस ही विमानसेवा उपलब्ध असणार असून यामध्ये सोमवार, शुक्रवार आणि रविवारचा समावेश आहे. सदर विमान बेळगाव येथून सायंकाळी 4.40 वाजता निघणार असून नाशिक येथे 5.40 वाजता पोहोचणार आहे. त्यानंतर सदर विमान नाशिक येथून सव्वासहा वाजता सुटणार असून बेळगाव येथे सव्वासात वाजता पोहोचणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या