नाशिकसह नऊ आगारातील बसेस कमी करण्याचा निर्णय

नाशिकसह नऊ आगारातील बसेस कमी करण्याचा निर्णय

नाशिक । प्रतिनिधी

मुंबईत पहिल्या लॉकडाऊनपासून ते आतापर्यंत करोना काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांची ने-आण करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ पार पाडत आहे. बेस्टच्या सेवेसाठी राज्यातील विविध विभागातील कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, या सेवेतील एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने बाधित होत आहे. त्यापार्श्वभूमीवर नाशिकसह नऊ विभागातून पुरविण्यात येणार्‍या बसेस कमी करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

गेल्या वर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने सप्टेंबर 2020 पासून मुंबई येथील बेस्टच्या सेवेसाठी टप्प्या-टप्प्याने एक हजार बसेसचा पुरवठा केला होता. या उपक्रमासाठी नाशिक विभागातील 40 बसेस वडाळा 10 बसेस प्रतिक्षानगर आगारात सेवा बजावित होत्या.

कोल्हापूर विभागातील 5 बसेस दिंडोशी आगारात, पुण्याच्या 40 बसेस देवनार आगारात, अहमदनगरच्या 40 बसेस घाटकोपर आगारात, सांगली विभागाच्या 25 बसेस प्रतिक्षानगर आगारात तर रायगडच्या 25 बसेस वरळी आगारात,

रत्नागिरीच्या 20 बसेस घाटकोपर आगारात पाठविण्यात आल्या होत्या. धुळेच्या 30 बसेस काळाकिल्ला आगारात तर साताराच्या 45 बसेस दिंडोशी आगारात कार्यरत होत्या. ‘बेस्ट’ सेवेच्या सक्तीविरोधात कामगार संघटनांनी प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार केला होता. विशेषत: संबंधित कर्मचार्‍यांना आवश्यक सुविधा पुरविल्या जात नसल्याचे चित्र होते. बेस्ट सेवेला एसटी कर्मचार्‍यांनी विरोध दर्शविला होता. कामगार संघटनांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

दरम्यान, अहमदनगर विभागाकडून बेस्ट उपक्रमातंर्गत घाटकोपर आगारात पुरविण्यात आलेल्या 40 बसेसपैकी 10 बसेस कमी करण्यात आल्या आहे. तर उर्वरित 30 बसेस ठाणे विभागाकडून सेवेत कायम राहितील. या बसेसची देखभालीची जबाबदारी तसेच कर्मचार्‍यांची नियुक्ती ठाणे विभागावर सोपविण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com