पक्ष चिन्हावर आज निर्णय?

निवडणूक आयोगात सुनावणी; ठाकरे - शिंदे गटाचे प्लॅन बी तयार
पक्ष चिन्हावर आज निर्णय?

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

शिंदे गट विरुद्ध ठाकरे गटात शिवसेनेचे चिन्ह (Shiv Sena symbol) कोणाला मिळणार, याबाबतचा निर्णय निवडणूक आयोग उद्या देण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे गट आणि शिंदे गटाला म्हणणे मांडण्यासाठी दिलेली मुदत शुक्रवारी (7 ऑक्टोबर) संपत असून निवडणूक आयोगापुढे याबाबत सुनावणी होणार आहे. त्यामुळे हा निर्णय आजच येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिवसेना म्हटले की डरकाळी फोडणारा वाघ आणि धनुष्यबाण हे चिन्ह असे समीकरण पक्के आहे. मात्र, शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर बंडखोर शिंदे गटाने थेट पक्षावरच अधिकार सांगितला आहे. एवढेच नाही, तर खरी शिवसेना आम्हीच असून आम्हालाच पक्षाचे धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मिळावे असाही दावा निवडणूक आयोगाकडे करण्यात आला. याविरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात गेला, तेथून ते प्रकरण घटनापीठाकडे गेले आणि अखेर न्यायालयानेही हा निर्णय घेण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला असल्याचे म्हटलें. यानंतर आता शिवसेनेचें धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जाते आहेत.

दरम्यान, अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असून उद्यापासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. त्यासाठी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना धनुष्यबाण निशाणी हवी आहे. पण धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आले तर दोन्ही गटाने प्लॅन बी तयार ठेवला आहे.याबाबत बुधवारी झालेल्या दसरा मेळाव्यात दोन्ही गटाकडून पक्षचिन्हाचे संकेत देण्यात आले आहेत.

शिंदे गटाची निशाणी तलवार असू शकते तर ठाकरे गटाची निशाणी गदा हे चिन्ह असू शकते. बुधवारी झालेल्या या दसरा मेळाव्यात दोन्ही गटाने जवळपास चिन्हांसाठी प्लॅन बी तयार केल्याचे जाणवले. हिदुत्वांचे विचार पुढे घेऊन निघालेले दोन्ही गट एकमेकांवर प्रहार करण्यासाठी आता सज्ज झाले आहेत आणि युद्धात लागणार्‍या शस्त्रांचा वापर दोन्ही गट निवडणूक चिन्हे म्हणून वापरण्याची शक्यता आहे. बीकेसीमध्ये तलावारीचे पुजन करून दसरा मेळाव्याला सुरुवात केली तर दुसरीकडे विरोधकांवर शिवतीर्थावर देखील शस्त्रपुजन करण्यात आले पण प्रतिस्पर्ध्यावर हल्लाबोल करताना गदेचा वारंवार उल्लेख करण्यात आला.

आता सर्वांना उत्सुकता आहे ठाकरे आणि शिंदे गटाची निशाणी काय असणार? दसरा मेळाव्यात वारंवार उल्लेख करण्यात आलेल्या तलवार आणि गदा चिन्ह दोन्ही गट घेणार की हिदुत्वांला शोभेल असे आणखी काही धारदार शस्त्रंच असणार हे लवकरच समजेल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com