'पैसे द्या अन् मंत्री व्हा'; मंत्रिपदाचे आमिष दाखवून आमदारांची फसवणूक; काय आहे प्रकरण?

Fraud
Fraud

मुंबई | Mumbai

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सत्तासंघर्षाच्याबाबत दिलेल्या निकालामध्ये शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) बचावले आहे. त्यामुळे आता उर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार नेमका कधी होणार याचे वेध सर्वच मंत्र्यांना लागले आहे. पण नवीन मंत्रिमंडळात आपला नंबर लागावा यासाठी सर्वच आमदार प्रयत्न देखील करत आहेत. पण याच गोष्टीचा गैरफायदा घेत एका भामट्याने आमदारांना गंडा घालण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे...

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 'मी, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J.P.Nadda) यांचा स्वीय्य साहाय्यक आहे. महाराष्ट्रात लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होत असून तुम्हाला नगर विकास मंत्रालय देण्यात येणार आहे. त्यासाठी तुम्हाला एक कोटी ६७ लाख रुपये द्यावे लागतील', असे सांगून एका भामट्याने मध्य नागपूरचे भारतीय जनता पक्षाचे आमदार विकास कुंभारे यांना गंडा घालण्याचा प्रयत्न केला.

Fraud
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा मुंबई दौऱ्यावर

गेल्या काही दिवसांत या संशयित आरोपीने काही भाजप (BJP) आमदारांना फोन केले होते. आपण नड्डांच्या जवळचे आहोत, असं सांगत मोठी रक्कम उकळण्याचा त्याचा प्रयत्न होता. काही आमदारांनी या भामट्याच्या दाव्यांना सत्य मानून त्याला लाखोंची रक्कम दिल्याचीही माहिती आहे. मात्र या गोष्टीला अद्याप पोलिसांकडून दुजोरा मिळालेला नाही.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या आशा पल्लवीत झाल्या. त्यानंतर गेल्या सात दिवसांपासून नीरज हा विकास कुंभारे यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधायचा. नगर विकासमंत्रीपद मिळवून देण्याच्या बहाण्याने त्यांना एक कोटी ६७ लाख रुपयांची मागणी करायचा.

०७ मे ला आरोपीने विकास कुंभारे यांना मॅसेज केला होता. पण सदर व्यक्तीचा कुंभारे यांना संशय आल्याने त्यांनी त्याची माहिती मिळवण्यास सुरूवात केली. त्यानंतर अशी कोणतीही व्यक्ती जे. पी. नड्डा यांच्या जवळची नसून किंवा संपर्कात ही नसल्याची माहिती विकास कुंभारे यांनी मिळाली. त्यानंतर कुंभारे यांनी लगेच याबाबतची माहिती पोलिसांना दिली.

Fraud
नाशिकमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणांचा राडा; पत्रकारांना मारहाण

तसेच नागपूर पोलिसांनीही तत्परतेने कार्यवाही करत या भामट्याला गुजरातमधील मोरबीमधून काल मंगळवारी (दि. १६ मे) रात्री उशिरा ताब्यात घेतले. आरोपी नीरज सिंह राठोड याने गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील काही भाजप आमदारांना संपर्क साधून तो भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या जवळचा असल्याचे सांगितले आहे. तसेच महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात महत्त्वाच्या विभागाची जबाबदारी मिळवून देतो, असे सांगून त्याने आमदारांकडून कोट्यवधी रुपयांची मागणीही केली असल्याचे तपासातून उघड झाले आहे.

दरम्यान, नीरज सिंह राठोड विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या भामट्याने फक्त महाराष्ट्रातील नाही तर गोवा आणि नागालँडमधील काही भाजप आमदारांनाही अशाच पद्धतीची बतावणी करून त्यांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com