शेततळ्यात बुडून तरुणाचा मृत्यू

शेततळ्यात बुडून तरुणाचा मृत्यू

चिचोंडी | प्रतिनिधी Chinchodi- Yeola

साताळी (ता. येवला) येथील मनोज सुभाष शिंदे (वय २५) या तरुणाचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवार (दि.१३) दुपारी चार वाजे दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. मनोज शिंदे यांच्या शेतात उन्हाळ कांद्याची लागवड सुरू असुन कांद्याला पाणी देणे गरजेचे असल्याने व वीज नसल्यामुळे मनोज हा शेताशेजारी शेततळ्यातून डोंगळा पद्धतीने कांद्याला पाणी देण्यास गेला असता त्याचा तोल जाऊन शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

मूळचे वनसगाव (ता. निफाड) येथील सुभाष शिंदे हे आपल्या दोन मुलांसमवेत साताळी (ता. येवला) महालखेडा रोड या ठिकाणी शेतात राहतात. दरम्यान कांद्याची लागवड सुरू असल्याने त्यांचा धाकटा मुलगा मनोज हा कांद्याला पाणी देण्यासाठी शेततळ्यातून पाणी घेत असताना तोल गेल्याने तो तळ्यात पडला. पोहता येत नसल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. कांदा लागवड करणाऱ्या महिलांनी आरडाओरड केली मात्र कोणालाच होता येत नसल्याने मनोज याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दरम्यान रात्री उशिरापर्यंत मनोज चा मृतदेह शोधण्याचे काम स्थानिक युवक तसेच चांदोरी येथील एनडीआरएफ ची टीम करत आहेत. मनोज याचा पाच महिन्यापूर्वीच निमगाव मढ येथील तरूणीशी विवाह झाला होता. दिवसा वीज असून देखील विजेच्या लपंडावामुळे ही दुर्दैवी घटना घडली असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

साताळी परिसरामध्ये दुर्दैवी घटनांची मालिका सुरूच असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान येवला तालुका पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com