तलावात बुडून तीन मुलांचा मृत्यू

jalgaon-digital
2 Min Read

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

दरेगाव हिल स्टेशनवर ( Daregaon Hill Station )फिरण्यासाठी गेलेली तीन अल्पवयीन मुले डोंगरालगतच्या तलावात पोहण्यासाठी उतरले असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने या तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. दोन दिवसात पाच मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने शहरात शोककळा पसरली आहे.

पवारवाडी भागातील नवरंग कॉलनीलगत वास्तव्यास असलेले नोमान अहमद सलमान झिया (16), मोहंमद साकीर साजिद अहमद (14) व महेफुज अहमद अन्सारी (12) ही तीन मुले आज दुपारी नमाज आटोपून दरेगाव हिल स्टेशनवर फिरण्यास गेले होते.

दरेगाव डोंगरामागील पाण्याने तुडूंब भरलेला तलाव पाहुन त्यांना पोहोण्याचा मोह झाला. ते पाण्यात उतरले असता 30 ते 35 फूट खोल पाण्याचा अंदाज त्यांना आली नाही. तसेच पोहोण्यात ते पारंगत नसल्याने तलावात बुडाले.

हा प्रकार काही लोकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने मनपाच्या शकील तैराकी यांना कळविले. शकील हे महामार्गावरच असल्याने घटनास्थळी तातडीने दाखल झाले व त्यांनी पाण्यात बुडालेल्या मुलांचा शोध सुरू केला.

किल्ला तैराक गृपचे कार्यकर्ते देखील तलावात उतरले. काही वेळेनंतर या तिघा बुडालेल्या मुलांचा शोध घेण्यात त्यांना यश आले. तिघांचे मृतदेह सामान्य रूग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी हलविण्यात आले.

दोन दिवसांपुर्वी मोसम नदीच्या पुरात दोघा मुलांचा बुडून मृत्यू झाला. आज पोहण्याच्या मोहामुळे पुन्हा तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने शहरात शोककळा पसरली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *