
सिन्नर | प्रतिनिधी | Sinnar
केंद्रीय राखीव सुरक्षा दलात कार्यरत असलेले जवान आपली पत्नी व दोन मुलांसोबत दुचाकीवरील तोल जाऊन कालव्यात पडल्याची घटना गुरुवारी (दि.9) सायंकाळी 6 च्या सुमारास तालु्नयातील चोंढी शिवारात घडली. मात्र, यात जवानाचा मृत्यू झाला असून तब्बल 20 तासांनंतर आज (दि.10) जवानाचा मृतदेह कालव्यात सापडला...
कालव्यात पडल्यानंतर जवानाने प्रसंगावधान राखत स्थानिकांच्या मदतीने पत्नी व मुलांना बाहेर काढण्यात यश मिळवले. मात्र, त्यांनतर ते वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. गणेश सुकदेव गिते (36) रा. मेंढी असे जवानाचे नाव आहे.
गणेश हे केंद्रीय राखीव सुरक्षा दलात कार्यरत असून पंतप्रधानांच्या विशेष पथकात ते तैनात होते. 24 फेब्रुवारी रोजी ते एका लग्नासाठी सुट्टीवर आले होते. गुरुवारी (दि. 10) ते पत्नी व मुलांसह शिर्डी येथे दर्शनासाठी गेलेले होते. तेथून दुचाकीने गावाकडे परतत असताना ही घटना घडली.
त्यांच्या घरापासून 300 मिटर अंतरावर तवंग परिसरात मेंढी-ब्राम्हणवाडे रस्त्यावरील वळणावर गणेश यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी गोदावरीच्या उजव्या कालव्यात पडली. कालव्याला आवर्तन सुटलेले असल्याने दुचाकी पडण्याचा आवाज होताच जवळच असलेल्या नितीन रावसाहेब गिते याने धाव घेतली.
पाण्यात पडल्यानंतर गणेश व नितीन यांनी गणेशची पत्नी रुपाली, मुलगी कस्तुरी व मुलगा अभिराज यांना बाहेर काढले. मात्र, पाण्याच्या प्रवाहात गणेश वाहून गेले. घटनेनंतर आदिवासी बांधवांसह स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत गणेशचा शोध सुरु केला. घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक संदेश पवार, हवालदार हिरामण बागुल, विजयसिंग ठाकुर, पोलिस नाईक धनाजी जाधव, विनोद जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली.
ग्रामस्थांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत गणेश यांचा शोध सुरु होता. मात्र, त्यांचा कुठेही तपास लागत नव्हता. आज (दि.10) दुपारी 2 वाजेपर्यंतही गणेश यांचा कुठेही तपास लागला नव्हता. यासाठी मालेगाव व नाशिक येथील बचाव पथकेही घटनास्थळी दाखल झाले होते.
त्यांच्याकडून पाण्यात बोट उतरवण्यात येऊन सकाळपासूनच शोध घेण्यात येत होता. सकाळी 11 वाजता कालव्याचे पाणी बंद करण्यात आल्यानंतर दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास घटनास्थळापासूनच 500 मीटर अंतरावर असलेल्या पाटमोरी भागातील तवंगावर गणेश यांचा मृतदेह आढळून आला. यानंतर मृतदेह ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.
पालकमंत्र्यांना ग्रामस्थांचा घेराव
20 तास उलटूनही जवानाचा मृतदेह सापडत नसल्याने पालमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) थेट घटनास्थळी दाखल झाले. यांनतर पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांना घेराव घालत जवानाचा शोध लागत नसल्याने रोष व्यक्त केला.
कालव्याचे पाणी रात्री बंद का केले नाही याबाबत ग्रामस्थ व नातेवाईकांनी त्यांना जाब विचारत जलसंपदा विभागाच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या. त्यानंतर ना. भुसे यांनी मृतदेह सापडेपर्यंत मी इथेच थांबणार असल्याचे सांगत तपास यंत्रणांना सुचना केल्या.
भुसे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित नाफेडची बैठक व निफाड तालुक्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा रद्द केला आणि ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी माजी आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे, सीमंतिनी कोकाटे घटनास्थळी उपस्थित होते.