
दिंडोरी |प्रतिनिधी Dindori
दिंडोरी तालुक्यातील जोपुळ आश्रमशाळेतील ( Aashram School, Jopul, Dindori)सहावीत शिकणाऱ्या ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरीही यात कुणाच्या हलगर्जीमुळे तर मृत्यू झाला नसेल ना? असा संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली जात आहे.
सविस्तर वृत्त असे की,आदिवासी विकास विभाग अंतर्गत असलेली जोपुळ, ता.दिंडोरी येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा येथील शाळेमध्ये इयत्ता सहावी मध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थी संकेत ज्ञानेश्वर गालट,( Sanket Dnyaneshwar Galat) वय -११वर्षे ६ महिने ,रा सावर्णा, ता.पेठ यास दिनांक १३/२/२०२३ रोजी किरकोळ खोकला व घसा दुखत असल्याने त्यास तेथील शिक्षकांनी प्राथमिक आरोग्य केंद्र खेडगाव या ठिकाणी सदर ठिकाणी उपचाराकरीता नेले होते.
त्यानंतर सदर मुलगा आश्रम शाळेच्या निवासी वसतिगृहाच्या ठिकाणी मुक्कामी असताना त्यास आज दिनांक १६/२/२०२३ रोजी पोट दुखत असल्याने शिक्षकांनी खेडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुढील उपचाराकरिता सिव्हिल हॉस्पिटल, नाशिक येथे नेण्यास सांगितले.
त्यावेळी संकेत गालट याचे बरोबर असलेले शिक्षक यांनी त्यास पिंपळगाव बसवंत येथील खाजगी रुग्णालय राधाकृष्ण हॉस्पिटल येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी देखील सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी घेऊन जाणे बाबत सूचना केली त्यानंतर पिंपळगाव बसवंत येथील ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी नेले असता तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी सदर मुलास मृत झाल्याचे घोषित केले.
मयत मुलाचे नातेवाईकांना माहिती कळविण्यात आली असून जिल्हा रुग्णालय नाशिक येथे शवविच्छेदन करता पाठविण्यात आले असून वणी पोलीस ठाणेस अकस्मात मृत्यू रजिस्टर दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलिस करीत आहेत.