मित्रांसमवेत सहलीला आलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

मित्रांसमवेत सहलीला आलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

सुरगाणा | प्रतिनिधी Surgana

पिंपळसोंड( Pimpalsond ) पैकी उंबरपाडा तातापाणी ( गरम पाण्याचे झरे) येथील साखळचोंड धबधब्यावरुन ( Sakhalchond Water Fall ) पाय घसरुन पंधरा फूट वरुन खडकावर पडल्याने एका विद्यार्थी पर्यटकाचा जागेवरच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत पिंपळसोंड येथील पोलिस पाटील रतन खोटरे यांच्याकडून समजले की, सुरत येथील सार्वजनिक काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नोलॉजी या महाविद्यालयात दुस-या वर्षात शिकणारा युवक तक्षिल संजाभाई प्रजापती वय १८ हा त्याच्या दहा ते बारा मित्रांसमवेत पिंपळसोंड येथील कुंडा रिसोर्ट येथे सहलीसाठी आला होता. दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास हे सर्वजण उंबरपाडा तातापाणी येथील साखळचोंड येथील वाहूटचोंड शाॅवर पाॅंईटधबधब्यावर अंघोळ करीत असतांना खडकावर शेवाळ असल्याने त्याचा पाय घसरुन पंधरा फूट खाली खडकावर पडल्याने डोक्याला गंभीर इजा झाली त्यात त्याचाजागीच मृत्यू झाला.

याबाबत आदिवासी बचाव अभियानाचे कार्यकर्ते रतन चौधरी यांना कळविले असता त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. पोलीस निरीक्षक संदीप कोळी, नितीन ढेपले, सह वनविभागाचे वनरक्षक कर्मचारी अविनाश छगने, वामन पवारयांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पाहणी करून सुमारे दीड हजार फूट खोल दरीतून मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने तिवशाची माळी येथे रस्त्यावर काढण्यात आला.पाच वाजेच्या सुमारास मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.खोद दरीतून मृतदेह बाहेर काढण्यासाठी नारायण गावित, माजी सैनिक शिवराम चौधरी,साधु गावित, अनिल बागुल, रामदास गावित, जसे तुंबडा,सुरेश चौधरी आदींनी परिश्रम घेतले.

निसर्गाने सौंदर्याची मुक्तहस्ताने केलेली उधळण म्हणजे पिंपळसोंड तातापाणी उंबरपाडा येथे अंबिकेची उपनदी भुतकुड्याच्या ओहोळावर चिंचचोंड,गायचोंड, शेळूणे, साखळचोंड, शाॅवरपाॅंईट, वाहूटचोंड असे एकाखाली एक असे पाच ते सहा साखळी धबधब्यांची मालिका आहे.हा भाग गुजरात सीमेलगतचा घनदाट जंगल व्याप्त असल्याने गर्द झाडी,लता वेली, महाकाय वृक्ष, दुर्मिळ औषधी वनस्पतींनी बहरलेला अतिदुर्गम डांग भाग आहे. पिंपळसोंड येथे कुंडा रिसोर्ट पर्यटकांना भुरळ घालणारे , आकर्षित करणारे असे असल्याने वीकेंडला खूप गर्दी असते. दरम्यान वनविभागाने सुविधा उपलब्ध कराव्यात अशी मागणी केली आहे.

शिवराम चौधरी- माजी सैनिक पिंपळसोंड.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com