धोकादायक इमारतींचे परीक्षण होणार

मास्टर मॉलच्या घटनेनंतर मनपाला जाग; गुन्हा दाखल
धोकादायक इमारतींचे परीक्षण होणार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शहरातील मध्यवर्ती ठिकाणी शालिमार चौकालगत असलेल्या गंजमाळ परिसरात ( Ganjmal Area )तीन मजली इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिक वस्तुंच्या मास्टर मॉलला ( Master Mall ) रविवारी आग ( Fire ) लागली होती. ही आग तीन दिवसांनंतर आटोक्यात आली.

अत्यंत दाटीवाटीच्या ठिकाणी ही व्यावसायिक इमारत कशी उभी राहिली, त्याचप्रमाणे अशा किती व्यावसायिक इमारती शहरात आहे, ज्या ठिकाणी अग्निशमन दलाची गाडी तसेच अ‍ॅम्बुलन्स व पोलिसांच्या गाडीला जाण्यासाठीही मार्ग नाही. याचा शोध आता महापालिका प्रशासन घेणार आहे. तसेच कायद्यानुसार ज्या इमारती तयार करण्यात आलेल्या नाही, त्यांना नोटीस देऊन कारवाई होणार आहे.

त्याचप्रमाणे गंजमाळ येथील मास्टर मॉलला लागलेल्या आगीची महापालिकेकडून चौकशी सुरु झाली आहे. महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी 28 तासांहून अधिक काळ धुमसत असलेल्या आगीच्या चौकशीसाठी समितीचे गठण केले असून आज पदाधिकार्‍यांनी दुपारी गंजमाळ या ठिकाणी जाऊन मास्टर मॉल या इमारतीची पाहणी केली.

अतिरिक्त आयुक्त अशोक आत्राम यांच्या अध्यक्षतेखालील समितीत उपायुक्त करुणा डहाळे, नगरचना विभागाचे संजय अग्रवाल, बांधकाम विभागाचे अधिकारी यांचा समिती समावेश असल्याचे समजते. रविवारी (दि. 19) संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान मास्टर मॉलला आग लागली होती तर सुमारे 28 तासानंतर ती आग आटोक्यात आली. महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी त्या ठिकाणी जाऊन अधिकार्‍यांना सूचना केल्यानंतर व इमारतीच्या समोरील भिंत तोडण्याचे आदेश दिल्यानंतर आग पूर्णपणे नियंत्रणात आली होती.

मास्टर मॉल ही इमारत अत्यंत दाटीवाटीच्या क्षेत्रात उभी राहिलेली होती तर त्या ठिकाणी अग्निशामक दलाच्या वाहनांना जाण्यासाठी देखील जागा नव्हती. त्याचप्रमाणे मोकळी हवा देखील मिळत नव्हती. यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. दरम्यान आता महापालिका प्रशासनाने शहरातील सर्व अशा धोकादायक दाटीवाटीच्या ठिकाणी असलेल्या व्यावसायिक इमारतींची चौकशी करण्याचे ठरविले आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com