अवकाळी पावसाने द्राक्षबागा संकटात

भाजीपाल्याचे नुकसान
अवकाळी पावसाने द्राक्षबागा संकटात

दिंडोरी । प्रतिनिधी

दिंडोरी शहरासह तालुक्यात वादळी वारा, गारांसह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने भाजीपाल्यासह द्राक्षबागा संकटात सापडल्या असून शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

दिंडोरी तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून वातावरणात बदल होऊन उकाडा जाणवत होता. त्यामुळे शरीराची लाहीलाही होत होती. घामाच्या धारा येत होत्या. त्यानंतर दुपारी सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण होऊन पाच वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटात गारांसह पावसाने जोरदार हजेरी लावली.

या पावसामुळे काही ठिकाणी द्राक्षबागांचे खरड छाटणीनंतर आलेले कोंब पावसामुळे भुईसपाट झाले. कवळ्या फुटींना जखमा होऊन गर्भधारणेत परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच खळ्यात काढून ठेवलेला कांदा, गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

काही ठिकाणी विजेच्या कडकडाटात गारांचा पाऊस झाला. तर काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकर्‍यांच्या काढलेल्या कांद्याची झाकण्यासाठी मोठी धावपळ उडाली. तसेच गहू, बाजरी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एका बाजूला करोनाचा कहर तर दुसर्‍या बाजूला पाऊस अशा कात्रीमध्ये नागरिक व शेतकरी सापडले आहेत.

नळवंडी परिसरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. द्राक्षबागांचे खरड छाटणीनंतर आलेले कोंब पावसामुळे भुईसपाट झाले. कवळ्या फुटींना जखमा होऊन गर्भधारणेत परिणाम होण्याची शक्यता आहे. पावसामुळे द्राक्षशेतीचे नुकसान होत असल्याने शेतकर्‍यांना आहोरात्र मेहनत करावी लागत असून द्राक्षबागा कशा वाचवाव्यात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

सुनील पाटील, शेतकरी, निळवंडी

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com