
नाशिकरोड । दिगंबर शहाणे Nashikroad
नाशिकरोड परिसरात जॉगिंग पार्क (Jogging park)व काही सार्वजनिक ठिकाणी विविध संस्था व लोकप्रतिनिधींच्या वतीने ग्रीन जिम( Green Gym) बसविण्यात आल्या आहेत. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून ग्रीन जिम बसविल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने सध्या या ग्रीनजिमची अवस्था असूनही नसल्यासारखी झाली आहे.
नाशिकरोड परिसरातील दत्तमंदिररोडवर( Dattamandir Road- Nashikroad ) असलेल्या शाळा क्रमांक 125 च्या जॉगिंग पार्कवर त्याचप्रमाणे शिखरेवाडी येथील महापालिकेच्या जॉगिंग पार्कवर व देवळाली गाव परिसरात असलेल्या गाडेकर मळा परिसरात व इतर ठिकाणी लोकप्रतिनिधी व काही सामाजिक संस्थांच्या वतीने ग्रीनजिम बसविण्यात आले आहे. या ग्रीन जिमचे थाटामाटात उद्घाटन करण्यात आले. मात्र त्यानंतर सदरच्या ग्रीन जिमकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. महापालिका किंवा ज्यांनी या ग्रीन बसविल्या, त्यांचेच याकडे दुर्लक्ष झाल्याने सध्या या ग्रीनजिमची अवस्था बिकट झाली आहे. परिणामी अनेक साहित्य तुटलेल्या अवस्थेत असल्याने जॉगिंग पार्कवर आलेल्या नागरिकांना या ग्रीनजिमचा पाहिजे तसा लाभ घेता येत नाही. त्याचप्रमाणे महत्त्वाच्या साहित्यांचे काही टवाळखोर मुले कोणी नसल्यावर नुकसान करतात. त्यामुळे हे साहित्य सध्या मोडकळीस आले आहे.
लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांच्या वतीने चांगल्या कामासाठी या जिम उभारल्या. व्यायामपटूंना फायदा व्हावा, त्यांना योग्य असा व्यायाम करता यावा म्हणून ग्रीनजिम उभारण्यात आल्या. परंतु त्याकडे नंतर दुर्लक्ष झाले. त्यामुळे या ग्रीनजिमकडे नागरिक व्यायाम करण्यास जात नाही. सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने या ग्रीन जिमचा फायदा नागरिकांना होत नाही.त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे पुरुष ग्रीन जिमवर व्यायाम करण्यासाठी जात होते तसेच महिलासुद्धा या ग्रीन जिमचा फायदा घेत होत्या, परंतु कालांतराने ग्रीम जिमच्या अनेक साहित्याचे नुकसान झाल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे महिलांनासुद्धा या ग्रीन जिमचा फायदा होत नाही. परिणामी अनेक युवक, युवती फिरण्यासाठी येणारे नागरिक हे वॉकिंग करून आपला व्यायाम करतात.
या ग्रीन जिमकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे अनेक व्यायामपटू खासगी जिममध्ये पैसे मोजून व्यायाम करण्यासाठी जातात.तर सर्वसामान्य नागरिक व्यायामापासून वंचित राहतात.या ग्रीन जिमकडे लक्ष देण्यासाठी व साहित्य व्यवस्थित राहावे, यासाठी महापालिकेने त्या ठिकाणी सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
सध्या नाशिकरोड परिसरात जॉगिंग पार्क व इतर ठिकाणी लोकप्रतिनिधींनी ग्रीन जिम बसविल्या आहेत. परंतु या ग्रीनजिमकडे नंतर दुर्लक्ष झाल्याने त्यांची वाताहत झाली आहे. त्यासाठी पुन्हा नव्याने सदर साहित्य दुरुस्त करण्यात यावे व काही ठिकाणी टवाळखोर नुकसान करतात त्यांच्यावर नजर ठेवून कडक कारवाई करावी.
शशिकांत चौधरी, नाशिकरोड