
खेडलेझुंगेे। वार्ताहर Khedlejhunge
तालुक्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे द्राक्ष, कांदा, गहू आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
निफाड तालुक्यातील पूर्व भागात पावसाने हजेरी लावल्याने द्राक्ष उत्पादकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मध्यरात्रीपासून विजांच्या कडकडाटासह या भागात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे द्राक्ष काढणी बंद करण्याची नामुष्की ओढावली आहे.
शेतात काढून ठेवलेला कांदा भिजला. रविवार (दि.5) पासून वातावरणातील बदलामुळे सकाळपासूनच सूर्य ढगाआड लपलेला होता. मध्यरात्रीच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग व्यथित झाला आहे. कांद्याला भाव नाही तर टोमॅटोची वाताहत झाली आहे. दिवसागणिक द्राक्षाचे दर घसरत असताना अवकाळी पावसाने शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. या अस्मानी संकटापुढे अगोदरच मेटाकुटीला आलेला शेतकरी वर्ग हतबल झाला आहे.
द्राक्ष, गहू, टरबुजाचे नुकसान
निफाड तालुक्यातील पूर्व भागात सोमवारी मध्यरात्रीपासून विजांच्या गडगडाटासह बेमोसमी पावसाला सुरुवात झाली आहे. सध्या कांद्याने शेतकर्यांचा वांदा केलेला असल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहे. कांद्याला कमी भाव असूनही केलेला खर्चाचा मेळ बसावा म्हणून जो कांदा काढून ठेवलेला आहे तो विक्री करण्याच्या गडबडीत शेतकरी आहे. अशात अनेक ठिकाणी शेतात काढून ठेवलेला कांदा या पावसात भिजला आहे. खेडलेझुंगे, सारोळे थडी, धारणगाव वीर, धारणगाव खडक, कोळगांव, कानळद, रुई-धानोरे परिसरामध्ये द्राक्ष-टरबूज काढणी, गहू-हरभरा सोंगणीचे काम सुरू असतानाच अचानक आलेल्या पावसाने शेतकर्यांची तारांबळ उडाली. अजून काही दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे.
पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव
अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान दिसू लागले आहे. कांदा पिकावर मोह, भुरी व करपा रोगाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट निर्माण होणार असल्याची चिंता शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे परिसरात उन्हाच्या वाढलेल्या प्रकोपामुळे आणि आता अवकाळीच्या तडाख्यामुळे कांदा पिकावर महागड्या कीटकनाशकांची फवारणी करावी लागणार आहे. त्यामुळे आर्थिक संकट गडद होणार आहे. कारण रासायनिक खते, कीटकनाशके व बुरशीजन्य औषधांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांना शासन स्तरावरुन मोठी मदत मिळणे गरजेचे आहे.