परतीच्या पावसामुळे द्राक्ष बागांवर बुरशीजन्य रोगाचा धोका

मका, सोयाबीन पिकांचे नुकसान
परतीच्या पावसामुळे द्राक्ष बागांवर बुरशीजन्य रोगाचा धोका

पालखेड मिरचिचे | Palkhed

निफाड तालुक्यात शुक्रवारी सकाळपासून परतीच्या संततधार पावसाला सुरुवात झाली आहे.

द्राक्षबागांच्या छाटण्यांना वेग आला असून, नवीन पालवी फुटलेल्या द्राक्षबागांवर बुरशीजन्य रोगांना पोषक हवामान तयार झाल्याने द्राक्षपंढरी हादरली आहे.

निफाड तालुक्यातील प्रमुख द्राक्ष उत्पादक पट्यात शुक्रवारी (दि.०९) सकाळपासूनच परतीच्या पावसाने जोर धरला आहे. या पावसामुळे शेतात कापणी करुन ठेवलेले सोयाबीन, मका ही खरिप हंगामाची पिके भिजली आहेत.

चालू हंगामात सततच्या पावसामुळे द्राक्षबागांच्या छाटण्यांना एक पंधरवडा विलंब झाला होता. त्यातच छाटण्या केल्यानंतर द्राक्षबागांच्या नवीन आलेल्या कोवळ्या फुटीवर, द्राक्षमालावर या दमट हवामान व पावसामुळे बुरशीजन्य रोगांचा मारा वाढणार आहे. त्यामुळे चालू द्राक्षहंगामाची पायाभरणीच कमकुवत होत आहे.

काही ठिकाणी द्राक्षबागांची छाटणी करुन त्यावर फुटव्यासाठी चोळावे लागणारे औषध देखील पावसामुळे लावता येत नाही, तर द्राक्षबागांत पावसामुळे चिखल होऊ लागल्याने ट्रँक्टरद्वारे फवारणी करण्यासही अडथळा येत आहे. एकूणच सकाळी सात वाजल्‍यापासून पावसाचा जोर वाढत गेल्याने द्राक्षपंढरीत खरिपाची पिके भिजली आहेत. शिवाय द्राक्षबागायतदारांचा जीव टांगणीला लागला आहे.

डावणी - बुरशीचे रोग बळावणार

सध्या अनेक द्राक्षबागातदारांनी आपल्या द्राक्षबागांची फळबहार छाटणी केली आहे. त्यामुळे कोवळ्या फुटी व पोंगा अवस्थेतील द्राक्षबागांवर डावणी बुरशीजन्य रोगांचा मारा वाढून नुकसान होण्याची शक्यता आहे.

पावसाची उघडीप होताच द्राक्ष बागायतदारांना अगोदर द्राक्षबागांच्या कोवळ्या फुटीवर असलेले पाणी हाताने झटकावे लागत असुन त्यानंतर ओषधांची फवारणी करावी लागत आहे.

- प्रकाश गायकवाड, द्राक्ष उत्पादक, गोरठाण

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com