Cyclone Tauktae : तौक्ते चक्रीवादळाचा धुमाकूळ, मुंबई विमानतळ बंद

घरांची पडझड, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित
Cyclone Tauktae : तौक्ते चक्रीवादळाचा धुमाकूळ, मुंबई विमानतळ बंद

मुंबई | Mumbai

दक्षिण पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेलं चक्रीवादळ तौक्ते गुजरातच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहे.

तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवायला सुरुवात झाली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे यांसह अनेक ठिकाणी याचा फटका बसला आहे. कोकण किनारपट्टीला समांतर वाटचाल करत असलेल्या तौत्के चक्रीवादळानं गती घेतली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होत आहे. तर काही ठिकाणी झाडांची पडझडही पाहायला मिळते.

वादळाच्या सद्यस्थितीबद्दल आणि पुढील काही तासांतील बदलामुळे हवामाने विभागाने माहिती प्रसिद्ध केली आहे. दीव किनारपट्टीसह गुजरातला रेड अलर्ट देण्यात आला आहे. सध्या चक्रीवादळाचं स्वरूप बदललं असून, वादळाने अतिरौद्र रुप धारण केलं आहे.

दरम्यान, मुंबईतील दादर, वरळी, लोअर परेल, माटुंगा, माहिमसह पश्चिम उपनगरात सर्वत्र जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. मुंबईतील वरळी सी फेस, शिवाजी पार्क, मरीन ड्राईव्ह या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर उंचच उंच लाटा उसळताना पाहायला मिळत आहे. येत्या काही काळात मुंबईतील पाऊस आणि वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पालघरसह इतर आजूबाजूच्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तसेच मुंबईमध्ये आज पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, समुद्राला उधाण येण्याची शक्यता असल्याने वांद्रे- वरळी सी लिंक पुढील आदेशापर्यंत बंद ठेवला जाणार आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिक त्याऐवजी माहीम-शिवाजी पार्क-प्रभादेवी (सिद्धिविनायक मंदिर मार्ग)-हाजी अली जंक्शन, या मार्गाचा वापर करु शकतात. तर मुंबई विमानतळ दुपारी ११ ते २ या वेळेत बंद असेल. अशी माहिती MIAL ने दिली आहे. घाटकोपर- विक्रोळी भागामध्ये मध्य रेल्वेच्या ओवर हेड वायर वर फांदी पडल्याने त्याची वाहतूक देखील मंदावल्याची माहिती देण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com