Cyclone Tauktea : बार्ज पी-३०५ दुर्घटनेत ३७ जणांचा मृत्यू, उर्वरीत सदस्यांचा शोध सुरू

Cyclone Tauktea : बार्ज पी-३०५ दुर्घटनेत ३७ जणांचा मृत्यू, उर्वरीत सदस्यांचा शोध सुरू

मुंबई | Mumbai

तौत्के चक्रीवादळाच्या तडाख्यात बॉम्बे हायजवळ तेल उत्खनन करणाऱ्या पी-३०५ या तराफ्याला दुर्घटना घडली. यामध्ये असलेल्या एकूण २६१ सदस्यांपैकी आत्तापर्यंत १८८ जणांना वाचवण्यात नौदलाला यश आले असून ३७ जणांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. अजूनही उर्वरीत सदस्यांचा शोध सुरू आहे.

नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व बचाव पथकाच्या प्रयत्नातून १८८ कर्मचाऱ्यांना वाचविण्यात आले. त्यानंतर बचावकार्य सुरू असताना रात्री आणखी ११ कर्मचाऱ्यांचे मृतदेह सापडले त्यामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा ३७ वर गेला. आयएनएस कोलकाता बुधवारी रात्री कर्मचाऱ्यांचे मृतदेह घेऊन मुंबईत पोहोचली. नौदलाचे बचावकार्य अखंडपणे सुरू आहे. बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी अरबी समुद्र पिंजून काढत आहेत.

ONGC च्या हीरा इंधन विहीर परिसरात 'पी ३०५' ही बार्ज नौका 'तौक्ते' चक्रीवादळात सोमवारी रात्री समुद्रात बुडाली. अपघातावेळी २६१ कर्मचारी तेथे कार्यरत होते. या सर्व कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी नौदलाच्या पाच युद्धनौका, तटरक्षक दलाच्या दोन नौका तसेच, दोन अन्य जहाजे सोमवार सायंकाळपासून बचावकार्य करीत आहेत. याशिवाय नौदलाची 'सी किंग' हेलिकॉप्टर आणि 'पी ८ आय' हे टेहाळणी विमानही मोहिमेत मदत करीत आहे.

दरम्यान, तौत्के चक्रीवादळाचा तडाखा महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीला बसण्याआधीच किनारी भागांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले होते. मच्छीमारांनाही समुद्रातून माघारी बोलावण्यात आले होते. त्याचप्रमाणे तटरक्षक दलाने ONGC आणि ऑफशोर डिफेन्स अॅडव्हायजरी ग्रुप अर्थात FODAG यांना जहाजे पुन्हा बंदरावर बोलावण्याच्या सूचना केल्या होत्या, अशी माहिती देखील समोर आली आहे. मात्र, असं असताना देखील तेल उत्खननाचं काम सुरूच कसं ठेवण्यात आलं? यावर चर्चा सुरू झाली आहे.

मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट्स करत म्हटलं, तौत्के चक्रीवादळ समुद्र किनारपट्टीवर जोरदार प्रहार करणार हे संबंधित यंत्रणेने सांगितलेले असतानाही ONGC ने सर्व सूचनांकडे दुर्लक्ष का केले? सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन का नाही केले? असा सवाल करतानाच कामगारांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, ही दुर्घटना नेमकी का घडली? यामागे दुर्लक्ष किंवा हलगर्जीपणा कारणीभूत आहे का? याचा तपास करण्यासाठी आता केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने या घटनेची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समितीची नेमणूक केली आहे. ONGC साठी तेल उत्खननाचं कंत्राट घेतलेल्या कंपनीसाठी तेल उत्खनन करणारा हा तराफा ऐन वादळात सापडला कसा? तो भरकटला कसा? आणि अंतिमत: बुडाला कसा? याची चौकशी करून ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com