चक्रीवादळामुळे दहा हजार गावातील वीज पुरवठा खंडित

६ हजार गावातील वीज पुरवठा पूर्ववत
चक्रीवादळामुळे दहा हजार गावातील वीज पुरवठा खंडित

मुंबई |प्रतिनिधी
चक्रीवादळ आणि मुसळधार पावसामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, कोल्हापूर, पुणे आणि राज्यातील इतर जिल्ह्यातील १० हजार ७५२ गावांतील वीज यंत्रणेचे नुकसान झाले आहे. त्यामुळे खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून ६ हजार ४० गावातील वीजपुरवठा मंगळवारी संध्याकाळपर्यंत सुरळीत करण्यात महावितरणला यश आले आहे.

चक्रीवादळाच्या तडाख्याने राज्यात शेकडो पोल पडले, तारा तुटल्या आणि जोरदार वारा तसेच मुसळाधार पावसाने फिडर ट्रिप झाले. अंधाऱ्या रात्रीची तमा न बाळगता रात्रभर जागून नागरिकांना सेवा दिली. तसेच आताही वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या महावितरणच्या अधिकारी, कर्मचारी आणि तंत्रज्ञ यांचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी कौतुक केले आहे.

चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेऊन डॉ. राऊत यांनी एक कृती आराखडा तयार करून विविध ठिकाणी नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. तसेच अधिकाधिक मनुष्यबळ या कामी लावण्याचे आणि लागणारी पुरेशी सामुग्री उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

त्यानुसार, कोल्हापूर, पालघर,पुणे,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे इत्यादी जिल्ह्यांसाठी २४ तास कार्यरत असणारे नियंत्रण कक्ष वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सध्या कार्यरत आहेत. तसेच विभाग स्तरावर ४६ नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. नुकसानग्रस्त भागातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कंपनीने १३ हजार तंत्रज्ञांची फौज मैदानात उतरवली आहे.


४६ लाख ग्राहकांवर परिणाम.. . .

चक्रीवादळामुळे जवळपास ४६ लाख ४१ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला. तर ३४ लाख १४ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. या चक्रीवादळाचा सगळ्यात मोठा फटका ठाणे जिल्ह्याला बसला असून यामुळे ७ लाख ८५ हजार ग्राहकांची बत्ती गुल झाली होती. आज संध्याकाळपर्यंत जवळपास ५ लाख ५० हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळाल्याची माहिती महावितरणने दिली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com