ढगफुटी सदृष्य पावसाचा हाहाकार; पिकांचे नुकसान

ढगफुटी सदृष्य पावसाचा हाहाकार; पिकांचे नुकसान

पंचाळे । वार्ताहर Sinnar/ Panchale

सिन्नर तालुक्याच्या ( Sinnar Taluka ) पूर्व भागात ढगफुटीसदृश पाऊस ( Heavy Rain )झाल्याने शेतात पाणीच पाणी झाले. कोसळधार पावसाने पिकांना फटका बसला असून पावसाचे पाणी शेतात साचून हातातोंडाशी आलेली पिेके सडणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

तालुक्याचा पूर्व भाग हा नेहमीच दुष्काळी परिसरात राहिलेला असून आजवर पावसाच्या अवकृपेमुळे या भागात उन्हाळ्यात पिण्यासाठीही पाणी उपलब्ध नसते. पिण्यासाठी व वापरण्यासाठी विकत पाणी घेण्याची वेळ परिसरातील नागरिकांवर येते. यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पुढील वर्षातले दुष्काळाचे सावट मिटले.

मात्र, पंचाळे, पांगरी, देवपूर, शहा आदी परिसरात तब्बल तीन वेळेस झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने शेतकर्‍यांचे पूर्ते हाल केले आहे. सुरुवातीपासून अनेक शेतांमध्ये पावसाचे पाणी साचून असल्याने अनेकांना पेरणीही करता आली नव्हती. काही दिवसांपूर्वीही पुन्हा एकदा पावसाने तडाखा देऊन परिसराला झोडपून काढले होते. मात्र, मंगळवारी (दि.6) रात्री पून्हा एकदा परिसरात ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने शेतांमध्ये तळे साचले आहे.

सावरगावात 150 हेक्टर पिकांना फटका

सावरगाव। जगदिश कुशारे Savargaon/ Niphad

सावरगाव परिसरात झालेल्या ढगफुटीमुळे आता नुुकसानीचे भयाण वास्तव समोर येवू लागले आहे. हातात आलेले टोमॅटो पीक भुईसपाट झाले. द्राक्षबागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. छाटणी झालेल्या द्राक्षबागांचे डोळ फुटले, सोयाबीन पीक आडवे पडले तर रस्त्याला नाल्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. काही ठिकाणी मातीचे ढिगारे तयार झाले असून वर्षभराची मेहनत क्षणार्धात वाया गेली असून निसर्गाच्या लहरीपणापुढे शेतकरी हतबल ठरला आहे. ढगफुटीमुळे एकट्या सावरगाव परिसरात जवळपास 150 हेक्टर क्षेत्रावरील पीके बाधित झाली आहेत.

तालुक्यातील सावरगाव परिसरात ढगफुटीचा पाऊस बरसला. त्याचवेळी विजपुरवठा देखील खंडीत झाला. मजुरवर्ग शेतातून घराकडे परतत असतांनाच या पावसाने हाहाकार उडवून दिला. या पावसामुळे एकट्या सावरगाव शिवारातील मका 25 हेक्टर, सोयाबीन 30 हेक्टर, टोमॅटो 95 हेक्टर, द्राक्षबागा 40 हेक्टर तर भाजीपाला 15 हेक्टर यासह भाजीपाला आणि इतर पीके मिळून जवळपास 150 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com