दर्जेदार पिकांचा महाराष्ट्र ब्रँड निर्माण करा

दर्जेदार पिकांचा महाराष्ट्र ब्रँड निर्माण करा

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

मुंबई । प्रतिनिधी

कृषी मालासाठी बाजारपेठेचे संशोधन करणे गरजेचे असून केवळ पीक उत्पादनात वाढ महत्वाची नाही तर महाराष्ट्राने आधुनिक तंत्रज्ञान तसेच उत्तम संशोधनाच्या माध्यमातून दर्जेदार पीक उत्पादन करावे आणि आपला ब्रँड निर्माण करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

यावर्षी पावसाळा सरसरीपेक्षा अधिक असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. शेतकरी बांधव मात्र कशाचाही अंदाज न घेता अहोरात्र मेहनत करून शेतीत राबत असतो. त्याला कधी निसर्गाची साथ मिळते कधी नाही. कधी खूप पीक येत तर त्याला भाव मिळत नाही. शेतकऱ्याच्या मालाला हमीभावापेक्षा हमखास भाव मिळण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असेही ठाकरे यांनी सांगितले.

यंदाच्या खरीप हंगामपूर्व राज्यस्तरीय बैठक उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी पिकांचे वर्गीकरण करून महाराष्ट्र शेतीतील ब्रॅण्ड व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

महाराष्ट्र जे पिकेल ते दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण असले पाहिजे, असे सांगतानाच ठाकरे यांनी विभागवार पिकांचे वर्गीकरण करून महाराष्ट्र हा शेतीतील ब्रॅण्ड झाला पाहिजे. शेतकऱ्याला त्याच्या पायावर सक्षमपणे उभ करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे, असे सांगितले.

कोरोनाच्या काळात अनेकांना वर्क फ्रॉम होमची सवलत आहे. तशी सवलत शेतकऱ्याला नाही. त्याला शेतात राबाव लागते. त्याने केलेल्या कष्टाचे चीज करण्याचे काम राज्य सरकार करत असून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे वचन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. कृषी विभागाची कामगिरी गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनकाळात आणि यंदाही उत्तम असल्याचे ठाकरे म्हणाले.

अर्थव्यवस्थेला बळ देण्याचे काम कृषी क्षेत्राने केले : उपमुख्यमंत्री

कोरोना काळातील बिकट परिस्थितीत अर्थव्यवस्थेला बळ देण्याचे काम कृषी क्षेत्राने केल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सागितले. कृषी विभागाने बियाण्यांच्या उगवण क्षमतेसाठी शेतकऱ्यांना सोबत घेऊन प्रशिक्षीत केले, त्यांना विश्वास दिला याबद्दल विभागाचे पवार यांनी कौतुक केले. रसायनिक खतांच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता होती. मात्र किमती करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याने सध्या खतांचा जो साठा विक्रेत्यांकडे आहे तो कमी दरात शेतकऱ्यांना मिळावा. यासाठी राज्य सरकारकडून नियोजन केले जाणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

तर राज्याचे खरीप हंगामातील अपेक्षित क्षेत्र १५७ लाख हेक्टर आहे. यामध्ये कापूस ४३ लाख, सोयाबीन ४३.५० लाख हेक्टर, भात १५.५० लाख हेक्टर, मका ८.८४ हेक्टर, कडधान्याचे क्षेत्र २३ लाख हेक्टर आणि उस ९.५० लाख हेक्टर आहे. खरीप हंगामासाठी सर्व प्रकारची मिळून ६३.६४ लाख मे.टन रासायनिक खते आणि १८.२६ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. सन २०२१-२२ साठी युरियाचा दीड लाख मेट्रीक टन संरक्षित साठा करण्याचे नियोजन असून सध्या ३० हजार मेट्रीक टन साठा झाल्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितले.

बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्यासह जिल्ह्यांचे पालकमंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, कृषी सभापती, मुख्य सचिव सीताराम कुंटे, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी खरीप हंगामाबाबत सादरीकरण केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com