राज्याचे बियाणे धोरण तत्काळ तयार करा - कृषीमंत्री दादा भुसे यांचे निर्देश

राज्याचे बियाणे धोरण तत्काळ तयार करा - कृषीमंत्री दादा भुसे यांचे निर्देश

मुंबई प्रतिनिधी

राज्यात बियाणे उद्योगास गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी राज्याचे बियाणे धोरण तात्काळ तयार करण्याच्या सूचना कृषीमंत्री दादा भुसे यांनी बुधवारी कृषी विभागाला दिल्या.

भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बियाणे धोरणाबाबत राज्यस्तरीय बैठक झाली. यावेळी विभागाचे सचिव एकनाथ डवले, आयुक्त धीरज कुमार, महाबिजचे व्यवस्थापकीय संचालक राहुल रेखावार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रंगा नायक, महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख हे उपस्थीत होते.

पश्चिम महाराष्ट्रात सोयाबिन पिकाची उत्पादकता जास्त असून महाबिजने येत्या खरीप हंगामात विदर्भ आणि मराठवाडा याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रात देखील बिजोत्पादन कार्यक्रमाचे आयोजन करावे. त्यासाठी राज्यातील तज्ञ व्यक्ती, कृषि विभाग, कृषि विद्यापिठे आणि महाबिज यांनी समन्वयाने शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी करावी. जेणेकरून राज्यात भेसळमुक्त आणि गुणवत्तापूर्ण बियाणे निर्मिती होईल. याबाबत आतापासून नियोजन केले तर येणाऱ्या वर्षभरात सकारात्मक बदल दिसून येईल, असेही भुसे यांनी सांगितले.

महाराष्ट्र हे बिजोत्पादनासाठी राष्ट्रीय पातळीवर अग्रेसर म्हणून गणले जात होते. तथापि अलीकडच्या काळात पिक पेरणीनुसार विशेषत: सोयाबिन, कापूस यासारख्या पिकांचे बियाणे परराज्यातून आणावे लागत आहे. राज्यातील बियाणे उद्योगास गतवैभव प्राप्त करून देणेसाठी आणि बियाणे उद्योगासाठी आश्वासक वातावरण निर्मिती करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे दादा भुसे यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com