Cornavirus : देशात २.५९ लाख नव्या रुग्णांची नोंद, साडेतीन लाखांहून अधिक करोनामुक्त

मृतांमध्ये पुन्हा वाढ
Cornavirus : देशात २.५९ लाख नव्या रुग्णांची नोंद, साडेतीन लाखांहून अधिक करोनामुक्त

दिल्ली | Delhi

भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार पाहायला मिळत आहे. काही दिवसांपासून दैनंदिन करोनाबाधितांच्या संख्येत काहीशा प्रमाणात घट झाली असली तरी महिनाभरापासून करोना रुग्णांच्या मृत्यूचं तांडव सुरु आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज चार हजारांच्या आसपास करोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. गेल्या २४ तासात चार हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत २ लाख ५९ हजार ५९१ नवे करोना रुग्ण आढळले असून ४ हजार २०९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोना रुग्णसंख्या २ कोटी ६० लाख ३१ हजार ९९१ इतकी झाली आहे.

तर आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २ लाख ९१ हजार ३३१ वर पोहोचली आहे. तसेच देशात गेल्या २४ तासात ३ लाख ५७ हजार २९५ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या संख्येसह करोनावर मात करणाऱ्यांची संख्या २ कोटी २७ लाख १२ हजार ७३५ वर पोहचली आहे.

देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान आतापर्यंत एकूण १९ कोटी १८ लाख ७९ हजार ५०३ लसीचे डोस देण्यात आले आहेत. यातील १४ लाख ८२ हजार ७५४ लसीचे डोस गुरुवारी देण्यात आले.

महाराष्ट्रातील स्थिती काय?

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना उतरणीला लागला आहे. दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. यामुळे मोठा दिलासा मिळत आहे. काल राज्यात ४७ हजार ३७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर २९ हजार ९११ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.

आजपर्यंत एकूण ५० लाख २६ हजार ३०८ करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.४ टक्के एवढे झाले आहे. काल दिवसभरात राज्यात ७३८ कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५५ टक्के एवढा आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com