उद्योग क्षेत्रासाठी कोविड विषयक टास्क फोर्स स्थापन करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

jalgaon-digital
3 Min Read

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर ( possibility of third wave of corona ) राज्यातील उद्योग क्षेत्रासाठीही ( Industrial Sector )कोविड विषयक टास्क फोर्स ( Covid Task Force ) स्थापन करावा आणि मुख्यमंत्री सचिवालयामार्फत याचे संनियंत्रण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी सोमवारी दिले.

करोना काळातही उद्योगांचे अर्थचक्र सुरू राहावे आणि उत्पादनांमध्ये अडथळे येऊ नये या दृष्टीने व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचनाही ठाकरे यांनी दिल्या. कोरोनात उत्पादन न थांबविता उद्योगांचे व्यवहार सुरू राहिले हे उदाहरण महाराष्ट्राने देशाला घालून द्यावे, असेही ठाकरे म्हणाले.

करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी ऑक्सिजन उत्पादन, साठा यांचे नियोजन तसेच उद्योगांतील कामगार- कर्मचारी यांचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण, निर्बंध कडक करावे लागले तरी आर्थिक चक्र सुरू ठेवणे, उत्पादनावर परिणाम होऊ न देणे, कामगारांची कंपनीच्या परिसरातील तात्पुरती फिल्ड निवास व्यवस्था, कामाच्या वेळा, कोविड प्रादुर्भाव होऊ न देणारी व्यवस्था (बायो बबल) आदी मुद्द्यांवर उद्धव ठाकरे यांनी आज सीआयआयच्या पदाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा केली.

आज सुमारे १३०० मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन राज्यात केले जाते. येणाऱ्या काळात कोव्हीडचे आव्हान अधिक वाढले तर ऑक्सिजनची मागणी दुसऱ्या लाटेपेक्षा देखील अधिक भासू शकते. त्यामुळे ऑक्सिजन निर्मितीबरोबरच ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणावर साठा करून ठेवणे, त्यासाठी टँक्स, सिलिंडरची आवश्यकता आहे, असे ठाकरे म्हणाले.

उद्योगांनी त्यांच्या कामगार, कर्मचाऱ्यांचे लसीकरण मोठ्या प्रमाणावर करून घ्यावे. आजमितीस केंद्राने दिलेला २५ लाख डोसेसचा साठा खासगी रुग्णालयांकडे आहे. तो मोठ्या प्रमाणावर वापरला गेला पाहिजे. छोट्या, मोठ्या उद्योगांमध्ये कोविडपासून प्रभावित न होणारी बायो बबल यंत्रणा निर्माण करून त्यामाध्यमातून आरोग्याचे नियम पाळून सुरक्षित उत्पादन सुरू ठेवता आले पाहिजे. काटेकोर निर्बंध लावावे लागले तर उत्पादनावर परिणाम होऊ नये म्हणून कामगारांच्या निवासासाठी कंपनीच्या परिसरात किंवा जवळपास फिल्ड निवास व्यवस्था उभारण्याच्यादृष्टिने नियोजन करावे. कामांच्या पाळ्या अशारीतीने निश्चित कराव्यात की, गर्दी होणार नाही आणि कुठल्याच सुविधेवर ताण येणार नाही हे पाहावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

तर गेल्या वर्षी पहिल्या कोरोना लाटेत २० लाख रुग्ण आढळले. दुसऱ्या लाटेत दोन ते तीन महिन्यातच ४० लाख रुग्ण आढळले. पुढील लाटेचा वेग कितीतरी जास्त असू शकतो. सध्या पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागात संसर्गाचे प्रमाण खूप जास्त आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी यावेळी दिली. केंद्राकडून २५ टक्के लसी खासगी रुग्णालयांना देण्याचे धोरण असून उद्योगांनी त्यांच्याशी बोलणी करून त्यांच्या कामगारांना मोठ्या प्रमाणावर लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

या ऑनलाइन बैठकीत सीआयआयचे पदाधिकारी उदय कोटक, निरंजन हिरानंदानी, हर्ष गोयंका, सलील पारेख, नील रहेजा, अनंत गोयंका, बाबा कल्याणी, बी त्यागराजन, जेन करकेडा, अनंत सिंघानिया, बनमाली अग्रवाल, निखिल मेसवाणी, अश्विन यार्दी, राशेष शहा, केशव मुरुगेश, भारत पुरी, असीम चरनिया, सुनील माथुर, संजीव सिंग, नौशाद फोर्बस, डी के सेन, सुलज्जा फिरोदिया मोटवाणी, शरद महिंद्रा आदी उद्योगपती सहभागी झाले होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *