CM Uddhav Thackeray: कडक निर्बंध लादण्याची आवश्यकता नाही : उद्यापासून १८+ चे राज्यात लसीकरण

CM Uddhav Thackeray: कडक निर्बंध लादण्याची आवश्यकता नाही : उद्यापासून १८+ चे राज्यात लसीकरण
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई :

मागील अनेक दिवसांपासून राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी महाराष्ट्र दिनाच्या पुर्वसंध्येला महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला.

संवादाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्यांना हुतात्मांना अभिवादन केले. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन दोन्ही एकाच दिवशी येतात. राज्याच्या निर्मितीसाठी कामगारांचे योगदान विसरुन चालणार नाही. गेल्या वर्षी १ मे ला लॉकडाउनच होता. याही वर्षी फारसा फरक नाही. हे काय दुष्टचक्र मागे लागले आहे. ते कळत नाही. साधारण आपण लॉकडाउन सदृश्य निर्बंध घातले आहेत. कालच उच्च न्यायालयाने विचारले की आजच्या बंधनांपेक्षा अधिक कडक लॉकडाउन लावण्याची आवश्यकता आहे का? मला वाटते याहून कडक निर्बंध लादण्याची आवश्यकता फारशी येणार नाही. कारण सगळे वागताना समजुतदारपणा दाखवत आहेत. रुग्णांची संख्या कमी झाली नसली तरी वाढ रोखण्यात आपण यशस्वी ठरलो.

रोजी मंदावेल पण रोटी थांबू देणार नाही

अजून काही काळ आपल्याला ही बंधने पाळण्याची आवश्यकता आहे. ही बंधनं लावणे सोपे आहे पण पाळणे अवघड आहे. नाईलाजाने आपली रोजी मंदावेल पण रोटी थांबू देणार नाही असे मी म्हणालो होतो. काहींना वाटतं की केंद्राने जे केले त्याप्रमाणे आपण करायला हवे. कुणा आपल्यापेक्षा चांगले काही केले असेल, तर ते करायला मला काहीही वाटणार नाही. मी कुणाचेही अनुकरण करायला तयार आहे.

तिसऱ्या लाटेचा सामन्यासाठी तयार

पहिल्या लाटेचा आपण सामना चांगला केला. परंतु दुसरी लाट त्यापेक्षा भयानक होती. त्याचा समोरे जातांना आपणास अनेक अडचणी आल्या. परंतु आता तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्याची तयारी आपण करत आहे. यामुळे तिसरी लाट आली तर त्याचा फटका आपणास जास्त बसणार नाही, याची तयारी आपण सुरु केली आहे. राज्यातल्या जिल्हाधिकार आणि विभागीय आयुक्तांची बैठक कालच मी घेतली. राज्यातल्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या प्लांटची उभारणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी २० ते २५ दिवसांचा काळ लागू शकतो. येत्या काही दिवसांत आपले हे सगळे प्लांट सुरू होतील. पण कोविडची तिसरी लाट आली, तरी ऑक्सिजन कुठेही कमी पडणार नाही ही तयारी आपण केली आहे. पण कोविडच्या तिसऱ्या लाटेची वेळ येऊ नये ही माझी प्रार्थना आहे.

गरज नसताना रेमडिसिवीर नको

सध्या रेमडेसिवीरची मागणी वाढली आहे. आपल्याला ५० हजार इंजेक्शनची गरज आहे. केंद्राने ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीरच्या वाटपाचे नियोजन आपल्याकडे घेतले आहे. सध्या ३५ हजाराच्या आसपास आपल्याला रोज इंजेक्शन मिळत आहेत. मला एकच सांगायचे आहे की, गरज नसताना रेमडेसिवीर वापरु नका. गरज नसताना हे इंजेक्शन वापरले तर त्याचे दुष्परिणाम होण्याचे शक्यता टाळता येउ शकत नाही. त्यामुळे गरज असेल तर रेमडेसिवीरचा वापर करावा

नाशिकमधील डॉक्टरअक्षरश: रडत होते

नाशिकमधील झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन लीक झाला होता. तेथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन बैठक मी घेतली. त्यामुळे ती लोक माझ्यासमोर अक्षरश: रडत होते. परभणीमध्येसुद्धा एक अकल्पीत घटना झाली. पावसाळा सुरु होणार आहे. कुठे पुर येईल, पाणी घुसेल. विजा कडाडणार. त्यामुळे मी ऑडिट करण्याचे सांगितले आहे. दुर्घटना टाळण्यासाठी जे जे करता येईल ते करतो आहोत.

लसीकरणासाठी एक रक्कमी चेक देण्यास तयार

उद्या १ मे पासून राज्यात १८ ते ४४ वर्षांचे लसीकरण राज्यात सुरु करण्यात येत आहे. त्यासाठी ३ लाख लसींचे डोस मिळाले आहे. त्याचे वितरण लोकसंख्येच्या प्रमाणात करण्यात आले आहे. परंतु राज्यातील या गटाची लोकसंख्या ६ कोटी आहे. म्हणजेच १२ कोटी लसींचे डोस हवे आहे. या लसी मिळण्यासाठी एक रक्कमी चेक देण्यास आम्ही तयार आहोत. परंतु लसींचा साठा कमी आहे. उद्यापासून १८ + वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सुरु होत आहे, उद्या पहिली लस दिली जाणार आहे, शेवटची नाही. माझे वचन आहे, माझ्या नागरिकांचे लसीकरण पेलायला आपलं सरकार तयार आहे. आपली पूर्ण तयारी झाली आहे. सुरुवातीला शिस्त येईपर्यंत गोंधळ उडेल, पण तो गोंधळ करु नका.यामुळे गर्दी करु नका. नंबर प्रमाणे लसीकरण केंद्रावर जा.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com