३१ मार्चपासून देशवासीयांना करोना निर्बंधांपासून दिलासा, पण 'या' दोन गोष्टी पाळाव्या लागणार

३१ मार्चपासून देशवासीयांना करोना निर्बंधांपासून दिलासा, पण 'या' दोन गोष्टी पाळाव्या लागणार

दिल्ली | Delhi

ठीक दोन वर्षांपूर्वीच आजच्या दिवशी देशभरात लॉकडाऊन (lockdown) सुरू झाला होता आणि अनेक निर्बंध लावण्यात आले होते. मात्र देशभरात करोनाची (corona) लाट आता ओसरत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं (central government) मोठी घोषणा केली आहे.

३१ मार्चपासून देशातील सर्व कोरोना निर्बंध हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे तब्बल दोन वर्षांनी देशातील जनता निर्बंधमुक्त जीवन जगणार आहे. पण, मास्क, सोशल डिस्टन्सिगचं पालन करणं मात्र अनिवार्य असणार आहे. मात्र, करोनाचे रुग्ण वाढू लागले तर निर्बंध पुन्हा लावण्याचा अधिकार राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आला आहे.

केंद्र सरकारने २४ मार्च २०२० रोजी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत पहिल्यांदा कोरोनाच्या मार्गदर्शन सूचना जारी केल्या होत्या. त्यानंतर कोरोना परिस्थितीनुसार अनेक वेळा मार्गदर्शन सूचनेत बदल करण्यात आले. आत सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला म्हणाले की, ‘२४ महिन्यात महामारी व्यवस्थापनासाठी विविध प्रकारच्या क्षमतांचा विकास केला गेला. यामध्ये चाचणी करणे, देखरेख ठेवणे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, उपचार, लसीकरण, रुग्णालयांचा विकास याचा समावेश आहे. यासोबत सर्वसामान्यांमध्ये कोरोनासंदर्भात जागरुकता वाढली आहे. ते कोरोनाला रोखण्यासाठी अनुकूल व्यवहार करू लागले आहेत. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी महामारी व्यवस्थापनसाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न केले आहेत. गेल्या सात आठवड्यात कोरोनाच्या नव्या रुग्णासंख्येत मोठी घट झाली आहे. २२ मार्चला देशात एकूण २३,९१३ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट ०.२८ टक्के झाला आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रयत्नामुळे आतापर्यंत देशात १८२,५६ कोटी लसीकरण झाले आहे. ३१ मार्चला सध्याच्या आदेशाचा कालावधी संपल्यानंतर गृह मंत्रालयाकडून पुढे कोणताही आदेश जारी केला जाणार नाही.’

गेल्या २४ तासांत देशात करोनाचे १ हजार ७७८ नवीन रुग्ण आढळले असून ६२ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत ४ कोटी ३० लाख १२ हजार ७४९ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच मंगळवारी दिवसभरात देशात २ हजार ५४२ लोक करोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर देशातील सक्रिय रुग्णांची संख्या २३ हजार ८७ वर आली आहे. कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या ५ लाख १६ हजार ६०५ झाली आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत ४ कोटी २४ लाख ७३ हजार ५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com