उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यांत आज मतमोजणी

उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यांत आज मतमोजणी

नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi

2024 मधील लोकसभा निवडणुकीची पूर्वपरीक्षा म्हणून पाहिल्या गेलेल्या उत्तर प्रदेश( Uttarpradesh ), पंजाब( Punjab ), उत्तराखंड( Uttarakhand ), गोवा( Goa) आणि मणिपूर ( Manipur ) या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी (votes counting for assembly elections ) आज (दि.10) होत आहे. या राज्यांतील मतदार कोणता जनादेश देतात याची उत्सूकता राजकीय पक्षांसह देशवासीयांना लागली आहे. पंजाब वगळता उत्तर प्रदेश आणि इतर 3 राज्यांत भाजपची सत्ता आहे. भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी विरोधी पक्षांनी कंबर कसल्याने 4 राज्यांत भाजपची प्रतिष्ठा पणास लागली आहे.

उत्तर प्रदेश निवडणुकीच्या मतदानाचा सातवा आणि अखेरचा टप्पा पार पडल्यानंतर विविध वृत्तसंस्था, वृत्तवाहिन्या आणि पाहणी संस्थांच्या मतदानोत्तर

चाचण्यांचे अंदाज जाहीर झाले आहेत. या अंदाजामुळे सर्वच राजकीय पक्षांची धाकधूक वाढली आहे. त्रिशंकू जनादेश मिळण्याची शक्यता असलेल्या राज्यांत सत्ता मिळवण्यासाठी राजकीय पक्षांनी नव्या समीकरणांची तयारी सुरू केली आहे.

सर्व 5 राज्यांत सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला ( Vote Counting )सुरुवात होणार आहे. प्रथम पोस्टाने आलेली मते मोजली जातील. त्यानंतर मतदान यंत्रांतील मतांची मोजणी केली जाईल.

उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या छोट्या राज्यांचे निवडणूक कल लवकर कळतील. मात्र उत्तरप्रदेश मोठे राज्य असून विधानसभेच्या 403 जागा आहेत. साहजिक उत्तर प्रदेश निवडणुकीचे कल समजण्यास काहीसा वेळ लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजांनुसार उत्तरप्रदेश आणि मणिपूर राज्यांत पुन्हा भाजपच सत्तेत येणार आहे.

पंजाबमध्ये सत्ता परिवर्तन होऊन काँग्रेसला शह देऊन आम आदमी पक्ष बहुमताने सत्तारूढ होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गोवा आणि उत्तराखंड राज्यांत त्रिशंकू कौलांची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भाजपची डोकेदुखी वाढणार?

उत्तरप्रदेश आणि मणिपूरमध्ये पुन्हा भाजपच सत्तेत येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गोवा आणि उत्तराखंडमध्ये भाजपसाठी धोक्याची घंटा वाजण्याची शक्यता आहे. गोव्यात कोणत्याच राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याची शक्यता वाढली आहे. उत्तराखंडमध्येही अशीच स्थिती निर्माण होण्याचा संभव आहे. साहजिकच निकालानंतर भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गोवा काँग्रेस उमेदवार सुरक्षित स्थळी

पणजी । 2017 मध्ये गोव्यात सर्वाधिक जागा मिळवूनही सरकार स्थापन करण्यात आलेल्या अपयशाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी काँग्रेसने मतमोजणीआधीच विधानसभा निवडणूक लढवलेल्या सर्व उमेदवारांना पणजीजवळील बांबोलीम येथील आलिशान रिसॉर्टमध्ये सुरळीत स्थळी हलवले आहे. राजकीय खेळी आणि हालचालींचा वेग लक्षात घेता पक्ष काही उमेदवारांना मतमोजणी केंद्राला भेट देण्याची परवानगी देणार नाही, असे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

काँग्रेसकडून निरीक्षकांची नेमणूक

उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूर राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेतृत्व सतर्क झाले आहे. निवडणूक व्यवस्थापनासाठी काँग्रेसने निवडणूक राज्यांसाठी वरिष्ठ नेत्यांची पक्ष निरीक्षक म्हणून नेमणूक केली आहे. कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार गोव्यात विशेष निरीक्षक असतील. सरचिटणीस मुकुल वासनिक आणि छत्तीसगडचे आरोग्यमंत्री टी. एस. सिंग देव, व्हिन्सेंट पाला यांची मणिपूरमध्ये नेमणूक करण्यात आली आहे. सरचिटणीस अजय माकन आणि पक्ष प्रवक्ते पवन खेरा यांना पंजाबसाठी विशेष निरीक्षक आहेत. उत्तराखंडमध्ये त्रिशंकू विधानसभा झाल्यास आमदारांच्या व्यवस्थापनासाठी राज्यसभा सदस्य दीपिंदरसिंग हुडा डेहराडूनला रवाना झाले आहेत.

50 हजार अधिकारी तैनात

5 राज्यांतील मतमोजणीसाठी 50 हजारांहून जास्त अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. करोनाविषयक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून मतमोजणी सुरू होईल. मतमोजणीसाठी 1,200 मतमोजणी हॉल तयार करण्यात आले आहेत. सर्वाधिक 403 जागा असलेल्या उत्तर प्रदेशात 750 हून जास्त मतमोजणी हॉल असतील. पंजाबमध्ये 200 हून जास्त मतमोजणी हॉलवर मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी 5 राज्यांत 650 मतमोजणी निरीक्षक नेमण्यात आले आहेत.

मतदान चाचण्यांवर बंदी घाला : बादल

चंदीगड । मतदानोत्तर चाचण्यांवर आपला विश्वास नाही. मतदानपूर्व किंवा मतनोत्तर चाचण्यांवर बंदी घातली पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी केले. आम्ही जनतेच्या आवाजाचे प्रतिनिधीत्व करतो. लोकसेवा करण्याची संधी आम्हाला देव देईल, असा विश्वास बादल यांनी व्यक्त केला.

केंद्रीय सुरक्षा दलाची निगराणी

लखनौ । उत्तर प्रदेश विधानसभेच्या 403 जागांच्या निवडणुकीची मतमोजणी उद्या (दि.10) होत आहे. मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस आणि प्रशासन तयारीत व्यस्त आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 250 तुकड्या येथे तैनात असणार आहेत. याशिवाय 61 पीएसी कंपन्या, 625 राजपत्रित पोलीस अधिकारी, 1,807 निरीक्षक, 9,598 उपनिरीक्षकांसह मोठा पोलीस फौजफाटा बंदोबस्तासाठी असेल.

काँग्रेस आआपाच्या संपर्कात

पणजी । गोव्यात त्रिशंकू विधानसभा झाल्यास सरकार स्थापनेसाठी पाठिंबा मिळवण्यासाठी आम आदमी पक्षाच्या संपर्कात असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला. आपचे नेते आधीच काँग्रेस नेत्यांशी चर्चा करीत आहेत. आआपा कोणत्याही परिस्थितीत भाजपला पाठिंबा देणार नाही, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षही काँग्रेसलाच पाठिंबा देईल, असे चोडणकर म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com