Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्यामनपाच्या शाळा स्मार्ट होणार

मनपाच्या शाळा स्मार्ट होणार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सुमारे शंभर कोटी रुपये खर्च करून नाशिक शहरातील महापालिकेच्या जवळपास सर्व शाळांना स्मार्ट ( Smart NMC Schools )करण्यात येणार आहे. नाशिक महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार ( NMC Commissioner Ramesh Pawar )यांनी यासाठी पुढाकार घेतला असून स्मार्ट सिटी कंपनीकडून ( Smart City Company ) शंभर कोटींचा निधी ( Funds )मिळणार आहे.

- Advertisement -

सध्या खासगी संस्थेच्या माध्यमातून शहरातील मनपाच्या शाळांचा सर्वे सुरू आहे. त्याचबरोबर यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यर्थ्यांसाठी ‘एक ड्रेस कोड’चा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक महापालिकेत आयुक्त तथा प्रशासक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर रमेश पवार यांनी विविध पातळीवर आपल्या कामाची झलक दाखवली आहे.

यामध्ये गोदावरी प्रदूषण, महापालिकेचे आर्थिक सक्षमीकरणानंतर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी, शाळांचा दर्जा, स्वच्छता कर्मचारी यांच्या कामकाजात गतिमानता आणण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या टप्प्यात महापालिकेच्या शाळांचे कामकाज अधिक सक्षम करण्यावर आयुक्त भर देणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून सगळ्या शाळांत स्मार्ट कामकाज सुरु करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी लक्ष घातले आहे. मुंबईत मनपाच्या शाळांना डिजीटल स्कूल करण्यासाठी मुंबई महापालिकेने मोठे काम केले आहे. त्याच धर्तीवर नाशिकला महापालिका शाळांचा दर्जा सुधारणार आहे मुंबई महापालिकेत कामकाजाचा अनुभव असलेल्या आयुक्तांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.

88 प्राथमिक, 13 माध्यमिक शाळा

महापालिकेच्या शाळांतील संगणकीकरण, इमारतीची डागडुजी, इंटरक्टीव्ह स्मार्ट बोर्ड, सीसीटीव्ही आदी सुविधा देत महापालिकेच्या शाळांना स्मार्ट करण्याचे नियोजन आहे. त्याचा आढावा घेतला जात आहे. महापालिकेच्या 88 प्राथमिक 13 माध्यमिक शाळांमध्ये कामकाजात व शैक्षणिक दर्जात सुधारणा होण्याच्या दृष्टीने आयुक्तांनी पुढाकार घेत कामकाजाच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळेच महापालिका शाळांचे कामकाज अधिक गतिमान होणार आहे.

प्रत्येक शाळातील एक संगणक कक्ष असेल. त्यात डिजीटल इंटरॅक्टीव्ह फलक असतील. या सगळ्या सुविधा देण्यापूर्वी महापालिकेला शाळांच्या इमारतीच्या सुरक्षेवर लक्ष द्यावे लागणार आहे. नाशिकला अनेक शाळांमध्ये साहित्य चोरीला जाते. नाशिकरोड विभागात गोरेवाडी शाळेत संगणकासह अनेक साहित्याची चोरी झाली असून, नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल आहे. रात्रीची सुरक्षा केली जात नसल्याने आधी महापालिकेला सुरक्षेची काळजी घ्यावी लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या